अनुजाचे स्वप्न ‘इंटेरियर डिझाईनर’चे
By Admin | Published: June 7, 2016 12:01 AM2016-06-07T00:01:54+5:302016-06-07T00:01:54+5:30
तीन वर्षांपूर्वी वडिलांचे अपघातात निधन झाले. तरीही नाऊमेद न होता अनुजा रवींद्र माकोडे हिने इयत्ता दहावीच्या परीक्षेत ९८.६० टक्के गुण प्राप्त करुन जिल्ह्यात प्रथम येण्याचा बहुमान मिळविला आहे
अमरावती : तीन वर्षांपूर्वी वडिलांचे अपघातात निधन झाले. तरीही नाऊमेद न होता अनुजा रवींद्र माकोडे हिने इयत्ता दहावीच्या परीक्षेत ९८.६० टक्के गुण प्राप्त करुन जिल्ह्यात प्रथम येण्याचा बहुमान मिळविला आहे. अनुजा हिला ‘इंटेरिअर डिझायनर’ क्षेत्रात करिअर घडवायचे असल्याचे तिने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
अंजनगाव सूर्जी येथील सीताबाई संगई कन्या विद्यालयाची विद्यार्थिनी अनुजा ही नाठे लेआऊटमधील सदानंदनगर येथील रहिवासी आहे. १२ वी पर्यंतचे शिक्षण हे विज्ञानमध्ये घ्यायचे असून पुढे फाईन आर्टकडे जायचे आहे. ‘इंटेरियर डिझायनर’ बनून करिअर घडविण्याचे स्वप्न असल्याचे तिने सांगितले. अभ्यासाचे नियोजन केल्यास यश नक्कीच मिळते अशी अनुजा म्हणाली. टी. व्ही. पाहण्यास हरकत नाही, परंतु वेळ ठरला पाहिजे. अभ्यासाच्या वेळेत अभ्यास हेच तंत्र वापरले पाहिजे. घरात आई, आजी, आजोबा व मोठी बहीण असून या सर्वाचे अभ्यासात मोठे पाठबळ मिळाले आहे. १० व्या वर्गात प्रवेश होताच खासगी शिकवणी लावण्यात आल्याचे अनुजा हिने सांगितले. करिअर घडविण्याचे ठरविले की ते कोणत्या क्षेत्रात घडवायचे हे अगोदर निश्चित केले तर घालमेल होती नाही, असे ती म्हणाली. मुंबई, औरंगाबाद किंवा नागपूर येथे जी -१ मध्ये प्रवेश मिळेल तसे ‘इंटेरियर डिझाईनर’ बनून करिअर घडवायचे आहे. डिझाईन, चित्रकला क्षेत्राची पूर्वीपासून रुची असून याच क्षेत्रात करिअर घडवेल, असे अनुजा हिचा मानस आहे. नियमित अभ्यास, शिक्षकांचे मार्गदर्शन हेच यशाचे गमक आहे. ती आपल्या यशाचे श्रेय आई आणि शिक्षकांना देते. जिल्ह्यात अव्वल आले असले तरी अनुजा हिला फाईन आर्ट अभ्यासक्रमाकडे जायचे आहे.