शाळेतील विद्यार्थ्यांच्या बनणार 'अपार आयडी'; शैक्षणिक कुंडली क्लिकवर मिळणार!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2024 01:05 PM2024-10-19T13:05:40+5:302024-10-19T13:07:24+5:30
डिजिटल माहिती उपलब्ध होणार : विद्यार्थ्यांसाठी आता 'अपार' आयडी
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीच्या दृष्टीने आधार कार्डप्रमाणेच विद्यार्थ्यांची स्वतंत्र शैक्षणिक माहिती डिजिटल स्वरूपात साठविण्याच्या उद्देशाने केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने प्रत्येक विद्यार्थ्यांचा 'अपार' (ऑटोमेटेड पर्मनंट अकॅडमिक रजिस्ट्री) नंबर तयार करण्याच्या सूचना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
विद्यार्थ्यांची शैक्षणिक माहिती डिजिटल स्वरूपात उपलब्ध व्हावी, तसेच पाहिजे तेव्हा ती ऑनलाइन स्वरूपात बघता यावी, यासाठी केंद्रीयशिक्षण मंत्रालयाने मोठा निर्णय घेतला आहे. यासाठी 'वन नेशन वन स्टुडंट' आयडीच्या धर्तीवर आता प्रत्येक विद्यार्थ्यांचा इयत्ता नववीपासून अपार नंबर तयार करण्यात येणार आहे. यामुळे नववी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक माहिती उपलब्ध होणार आहे. हा नंबर डिजीलॉकरलाही जोडण्यात येणार आहे. पुढील एक महिन्यात यावर अंमलबजावणी करण्यात यावी, अशा सूचना राज्य प्रकल्प संचालकांकडून जिल्हा परिषदेला दिल्या आहेत. 'अपार' मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक रेकॉर्ड एका शाळेतून दुसऱ्या शाळेत किंवा जिल्हा आणि राज्यामध्ये ऑनलाइन पाठवणे सुलभ होईल. विद्यार्थ्यांचे 'अपार' आयडी विद्या समीक्षा केंद्रांना जोडण्यात येऊन त्या माहितीचे ग्राफिकल अॅनालिसिस करण्यात येईल. 'यू' डायस प्लस प्रणालीच्या ज्या विद्यार्थ्यांचे आधार वैध असेल, त्यांचेच अपार आयडी तयार होतील. अपारमुळे विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या सुविधा, प्रगती अहवाल, शाळाबाह्य मुलांचा शोध, गळतीचे प्रमाण घटविण्यास मदत करणे आदी बाबी नियंत्रित करण्यात येणार आहेत.
एका क्लिकवर माहिती होणार उपलब्ध
'अपार'मुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासाचे मॉनिटरिंग सोपे होणार आहे. 'अपार आयडी तयार झाल्यानंतर तो डिजीलॉकरला जोडण्यात येईल. त्यामुळे विद्यार्थ्यांनी शिक्षण क्षेत्रात साधलेले लक्ष्य दहावी आणि बारावी परीक्षेचे निकाल, उपक्रम आणि स्पर्धा परीक्षांमधील यश आदी माहिती ऑनलाइन पाहता येणार आहे.