अमरावती विद्यापीठाच्या हिवाळी परीक्षेच्या तारखांमध्ये वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2021 06:39 PM2021-12-12T18:39:51+5:302021-12-13T16:18:03+5:30
विद्यापीठाने हिवाळी परीक्षा अर्ज सादरीकरण्याच्या तारखेत मुदतवाढ देण्याचा निर्णय १० डिसेंबर रोजी घेतला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला असून, परीक्षा अर्ज १४ ते १६ डिसेंबरपर्यंत ऑनलाईन सादर करावे लागणार आहे.
अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने हिवाळी २०२१ परीक्षांचे आवेदनपत्र सादरीकरणास मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला असून, परीक्षा अर्ज १४ ते १६ डिसेंबरपर्यंत ऑनलाईन सादर करावे लागणार आहे. यापूर्वी १० डिसेंबरपर्यंतच अर्ज सादर करण्याची संधी होती, हे विशेष.
विद्यापीठाने हिवाळी परीक्षा अर्ज सादरीकरण्याच्या तारखेत मुदतवाढ देण्याचा निर्णय १० डिसेंबर रोजी घेतला आहे. त्याअनुषंगाने परीक्षा विभागाने प्राचार्य, विभागप्रमुख, मानद संचालक तसेच विद्यापीठाच्या पदवी, पदव्युत्तर शैक्षणिक विभागाला देखील कळविण्यात आले आहे. यात हिवाळी परीक्षांचे आवेदनपत्रे ऑनलाईन सादर करण्यासाठी नियमित प्रवेशित (विषय सत्रांचे)व माजी विद्यार्थी (सम, विषम सत्र) परीक्षांचे आवेदनपत्रे सादर करता येणार आहे. यापूर्वी विद्यार्थ्यांना यूझर आयडी, पासवर्ड तयार करण्यासाठी गॅप रजिस्ट्रेशन पॅनेल हे १४ ते १६ डिसे्ंबर या कालावधीत सुरू राहणार आहे. याच दरम्यान परीक्षांचे अर्ज ऑनलाईन सादर करावे लागणार आहे. आतापर्यत पावणे दोन लाख परीक्षा अर्ज प्राप्त झाले आहेत.
परीक्षा अर्ज सादरकरण्यासाठी ही शेवटची संधी
हिवाळी परीक्षेचे अर्ज ऑनलाईन सादर करण्यासाठी १४ ते १६ डिसेंबरपर्यत ही शेवटची संधी असणार आहे. त्यानंतर मुदतवाढ मिळणार नाही, ही बाब परीक्षा विभागाने स्पष्ट केली आहे. आतापर्यत ज्या विद्यार्थ्यांनी हिवाळीपरीक्षा २०२१ चे परीक्षा अर्ज ऑनलाईन सादर केले नाही, त्यांनी १४ ते १६ यादरम्यान ऑनलाईन भरावे,असे आवाहन विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने केले आहे.
आतापर्यत सुमारे पावणे दोन लाख परीक्षा अर्ज प्राप्त झाले आहे. विशेष बाब म्हणून परीक्षा अर्ज सादर करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. याचा लाभ पालक, विद्यार्थ्यांनी घेणे आवश्यक आहे. यापुढे परीक्षा अर्ज सादर करण्याच्या तारखेत मुदतवढ मिळणार नाही.
- हेमंय देशमुख, संचालक, परीक्षा व मू्ल्यांकन मंडळ