RTE प्रवेशासाठी आजपासून करा ऑनलाईन अर्ज; आदेश धडकले! १७ ते ३१ मे पर्यत 'डेडलाईन'
By जितेंद्र दखने | Published: May 16, 2024 09:43 PM2024-05-16T21:43:44+5:302024-05-16T21:45:27+5:30
शालेय शिक्षण विभागातर्फे शिक्षण हक्क कायद्यांतर्गत २५ टक्के आरक्षित जागांवर आरटीई प्रवेश प्रक्रिया राबवली जाते.
जितेंद्र दखने, अमरावती : शिक्षणहक्क कायद्यांतर्गत (आरटीई) खासगी शाळांमध्ये प्रवेशासाठी राबविण्यात येणाऱ्या प्रवेश प्रक्रियेला पुन्हा नव्याने शुक्रवार १७ मे पासून सुरुवात होणार आहे. त्यामुळे यापूर्वी, प्रवेशासाठी अर्ज केलेल्या पालकांसोबतच आरटीईतून प्रवेश घेण्यासाठी इच्छुक असलेल्या पालकांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. याबाबत प्राथमिक शिक्षण संचालक यांचेकडून जारी केलेले आदेश गुरूवार १६ मे रोजी झेडपी शिक्षण विभागात धडकले आहेत.
शालेय शिक्षण विभागातर्फे शिक्षण हक्क कायद्यांतर्गत २५ टक्के आरक्षित जागांवर आरटीई प्रवेश प्रक्रिया राबवली जाते. मात्र, शिक्षण विभागाने कायद्यात बदल केल्यामुळे केवळ मराठी माध्यमाच्या सरकारी, अनुदानित व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये प्राधान्याने प्रवेश देण्यात येणार होता. विद्यार्थ्यांच्या घरापासून एक किमी अंतरावर इंग्रजी माध्यमाच्या स्वयंअर्थसहाय्यित शाळा असूनही या शाळांमध्ये विद्यार्थ्याना प्रवेशाची संधी मिळणार नव्हती. या पार्श्वभूमीवर शासनाच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली होती.
न्यायालयाने शासनाच्या ९ फेब्रुवारी २०२४च्या अधिसूचनेला स्थगिती दिली. त्यामुळे जुन्याच पद्धतीने इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये आरटीई प्रवेश प्रक्रिया राबवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. न्यायालयाच्या आदेशानंतर शालेय शिक्षण विभागाने आरटीई प्रवेश प्रक्रियेत बदल करण्यास सुरूवात केली आहे. त्यानुसार २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात जिल्ह्यातील २३१ इंग्रजी माध्यमाच्या शाळांमधील २ हजार ३६९ जागांवर प्रवेशासाठी १७ ते ३१ मे या कालावधीत ऑनलाईन अर्ज करावयाचे आहेत.पालकांनी वर दिलेल्या कालावधीत ऑनलाईन अर्ज सादर करावे असे आवाहन जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी बुध्दभुषण सोनवने यांनी केले आहे.