प्राण्यांना रंग लावल्यास होऊ शकते शिक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2019 02:15 PM2019-03-19T14:15:59+5:302019-03-19T14:20:43+5:30
प्राण्यांना रंग लावल्यास शिक्षेची तरतूद असून, हिडीस प्रदर्शन न करता नैसर्गिक रंगांनी रंगपंचमी खेळा, असे आवाहन वसा या अमरावतीमधील संस्थेकडून करण्यात आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : आनंद व उत्साहाचे प्रतीक असलेला होळी सण अवघ्या तीन दिवसांवर येऊन ठेपला आहे. लहान मंडळी तर आठवड्याभरापासून खरेदी आणि इतर तयारीत व्यस्त आहेत. या पार्श्वभूमीवर वसा या अमरावतीमधील संस्थेने सोशल मीडियावर जनजागृतीपर मार्गदर्शन केले आहे. प्राण्यांना रंग लावल्यास शिक्षेची तरतूद असून, हिडीस प्रदर्शन न करता नैसर्गिक रंगांनी रंगपंचमी खेळा, असे आवाहन संस्थेकडून करण्यात आले आहे.
समाजात अनेक जण सणाच्या अतिउत्साहात रस्त्यावरील बेवारस श्वान, मांजरी, गाय, बैल, गाढव आणि वन्यजिवामध्ये विशेषत: माकडांना गंमत म्हणून रंग लावतात. या रंगामुळे प्राण्यांना अंधत्व येऊ शकते. त्यांना त्वचेचे दुधर आजार होऊ शकतात. त्यामुळे प्राण्यांसोबत होळी न खेळण्याचे आवाहन ठकसेन ऊर्फ तुषार इंगोले व शुभम सांयके यांनी केले आहे.
रस्त्यावरील बेवारस प्राण्यांना रंग लावल्यास, त्यांच्या अंगावर होळीतील गरम पाणी टाकल्यास किंवा त्यांना इतर कोणताही त्रास दिल्यास, हा प्रकार प्राणी क्रूरता कायदा १९६० आणि हाच प्रकार वन्यजिवाबाबत झाल्यास वन्यजीव संरक्षण कायदा १९७२ सुधारणा कायदा २००२ नुसार शिक्षेस पात्र आहे, अशी माहिती वसाचे अॅनिमल रेस्क्यूअर अभिजित दाणी यांनी दिली.
आपल्या थोड्याशा मौजेसाठी रासायनिक रंगाने होळी खेळून आपल्या आरोग्यासोबत खेळ करणे ही योग्य बाब नाही. लहानग्यांना या रासायनिक रंगाबद्दल माहिती नाही. तेव्हा घरातील मोठ्या आणि जबाबदार व्यक्तींनी लहानग्यांना नैसर्गिक रंग खेळायला द्यायला हवे.
- रोहित रेवाळकर, निसर्गप्रेमी
रासायनिक रंगांचे अनेक दुष्पपरिणाम
रासायनिक रंगांचे अनेक दुष्पपरिणाम आहेत. लाल रंगात मर्क्युरी सल्फाइटचा वापर होतो. यामुळे लकवा, मेंदूची वाढ खुंटणे, कर्करोग असे आजार जडतात. काळ्या रंगासाठी लेड आॅक्साइड वापरले जाते. यामुळे त्वचेला खाज, मूत्रपिंडाचे विकार बळावतात. हिरव्या रंगात कॉपर सल्फेट मोठ्या प्रमाणात असते. डोळ्यांची खाज व त्यातून पाणी येण्याचे प्रकार यातून घडतात. निळा रंग पार्शियन ब्लू या रसायनाच्या वापरातून बनविले जाते. त्यामुळे त्वचेचे विकार होतात. चांदी रंग अल्युमिनियम ब्रोमाइडने बनविला जातो. त्वचेचा कर्करोग होण्याची भीती यामुळे असल्याचे संस्थेचे मुकेश वाघमारे यांनी सांगितले.
कसा तयार करता येतो नैसर्गिक रंग?
रंग काय वापराल? प्रक्रिया
जांभळा बीट फळाची साल आणि गर पाण्यात विरघळवून रंग तयार होतो
पिवळा हळकुंड आणि झेंडूची फुले पाण्यात उकळून रंग तयार होतो
काळा आवळ्याच्या किस लोखंडी भांड्यात उकळून काळा रंग तयार होतो
लाल पळसाचे फुलं, गुलाबाच्या पाकळ्या कुस्करून आकर्षक लाल रंग होतो
हिरवा झाडांची हिरवी पाने लगदा तयार करून पाण्यात टाकावा