उदापूरकरप्रकरणी विशेष वकिलाची नियुक्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2017 12:07 AM2017-05-28T00:07:51+5:302017-05-28T00:07:51+5:30
आयपीएल सट्टा प्रकरणातील मुख्य आरोपी कुख्यात बुकी संजय उदापूरकर याला अटक करण्यात पोलीस अपयशी ठरले आहे.
आयपीएल क्रिकेट सट्टा प्रकरण : अपयश पुसून काढण्याचा प्रयत्न
लोकमत न्यूज नेटवर्क
अंजनगाव सुर्जी : आयपीएल सट्टा प्रकरणातील मुख्य आरोपी कुख्यात बुकी संजय उदापूरकर याला अटक करण्यात पोलीस अपयशी ठरले आहे. उदापूरकरवर लावलेले सर्व गुन्हे हे जामीनपात्र आहेत. त्याला अटकपूर्व जामीन मिळू शकतो, असे वाटत असल्याने पोलिसांनी याप्रकरणी विशेष वकिलाची नियुक्ती केली असल्याची माहिती हाती आली आहे.
दुसरीकडे परतवाडा येथे पुन्हा एकदा उदापूरकर सक्रिय झाला असल्याची माहिती आहे. जिल्हाभर नेटवर्क व पोलिसांशी असलेल्या संबंधाचा वापर करून तो अजुनही मोकाट फिरत असल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
आयपीएल क्रिकेट सट्टा प्रकरणात पोलिसांची नामुष्की होत असल्याने पोलीस अधीक्षक स्वत: या प्रकरणात लक्ष घालत असून त्यांनी संजय उदापुरकरला जामीन मिळू नये यासाठी विशेष वकिलाची नियुक्ती केली असल्याची माहिती आहे. या प्रकरणात संजय उदापूरकर यास अटक केल्यावर त्याला पोलीस कोठडी मिळावा व त्याच्याकडून संपूर्ण सट्टा रॅकटची माहिती जाणून घेता यावी यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
संजय उदापूरकरबद्दल "सॉफ्ट कॉर्नर" निर्माण करण्याचा प्रयत्न देखील केला जात आहे. त्याने अनेकांना मदत केली असल्याच्या बातम्या पसरविल्या जात आहेत. उदापूरकरचे धारणी, अचलपूर, चिखलदरा तालुक्यातील पोलीस अधिकाऱ्यांशी संबंध असल्याने त्याच्याबद्दलच्या चांगल्या बातम्या पसरवून दिशाभूल केली जात आहे. पोलीस अधीक्षक याप्रकरणी फारसे बोलत नाहीत. मात्र, त्यांनी या प्रकरणाची चौकशी केली जात असल्याची माहिती दिली. दरम्यान संजय उदापूरकला अटक व्हावी, व त्यांला शह देणाऱ्याची नावे उघड व्हावी, अशी चर्चा अंजनगावात सुरू आहे. याप्रकरणी ‘लोकमत’लादेखील संजय उदापूरकरच्या चांगल्या गोष्टींची माहिती देण्याचा प्रयत्न सुरू आहे.