महावितरणच्या ७५७ उपकेंद्र सहाय्यकाच्या नियुक्त्या रखडल्या
By गणेश वासनिक | Published: June 26, 2023 05:43 PM2023-06-26T17:43:16+5:302023-06-26T17:54:43+5:30
उपमुख्यमंत्री तथा उर्जामंत्री यांनी शब्द न पाळल्याचा उमेदवारांचा आक्षेप, कोरोनानंतर आरक्षण लागू करण्याचा निर्णय
अमरावती : राज्यात महावितरणच्या ७५७ उपकेंद्र सहाय्यक (ऑपरेटर)च्या नियुक्त्या रखडल्या आहेत. यात सत्ताधाऱ्यांची अनास्था असल्याचा आक्षेप उमेदवारांनी घेतला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री तथा उर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांची वारंवार भेट घेतली. मुंबईच्या आझाद मैदानावर २० दिवस आंदोलन केले तरीही हा प्रश्न सुटत नसल्याचे वास्तव आहे.
महावितरणने २३०० उपकेंद्र सहाय्यक (ऑपरेटर) पदभरतीसाठी २०१९ मध्ये परीक्षा घेतली. १०२९ मुलांची यादी जाहीर केली. त्यापैकी ७५७ उमेदवारांना नियुक्त्या दिल्या नाहीत. कोरोना आणि सत्ता स्थापनेमुळे निवड यादी आणि प्रतीक्षा यादीचा निकाल जून २०२० मध्ये जाहीर झाला. दरम्यान ९ सप्टेबर २०२० रोजी मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाली. एसईबीसी, ईडब्ल्यू एस पात्र उमेदवार वगळून नियुक्त्या देण्यात आल्या आहेत. मात्र आता महावितरणणने २०२२ पासून समांतर आरक्षण लागू केले. त्यामुळे ७५७ मुलांना बेरोजगार झाले असून, चार वर्षांपासून यादी पूर्ण होण्याची प्रतीक्षा आहे.
ना. फडणवीस यांनी २० डिसेंबर २०२२ ला नागपूर हिवाळी अधिवेशनात महावितरणमध्ये उपकेंद्र सहाय्यक पदाच्या सात हजार पदे रिक्त आहे. त्यामुळे जे प्रतीक्षा यादीतील ७५७ उमेदवार बाहेर पडले त्यांना नियुक्त्या दिल्या जातील, असे आश्वासीत केले होते. मात्र आता महावितरणने प्रतीक्षा यादीतील उमेदवार नियमात बसत नसल्याचा मार्ग काढून प्रतीक्षा यादीतील उमेदवारांवरील अन्याय दूर करावा, अशी मागणी उमेदवार विवेक गजभिये यांनी केली आहे. या मागणीचे निवेदन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमत्रीं देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठविले आहे.