तालुका क्रीडा संकुलासाठी निधी वितरणास मान्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2021 04:12 AM2021-07-29T04:12:45+5:302021-07-29T04:12:45+5:30
पालकमंत्री : अमरावती : जिल्ह्यातील विविध क्रीडा संकुलांच्या विकासासाठी निधी वितरणासाठी क्रीडा विभागातर्फे मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे तालुका ...
पालकमंत्री :
अमरावती : जिल्ह्यातील विविध क्रीडा संकुलांच्या विकासासाठी निधी वितरणासाठी क्रीडा विभागातर्फे मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे तालुका क्रीडा संकुलांची देखभाल, आवश्यक सुविधा सुरळीत ठेवण्यासाठी उपयोग होईल. संकुलाच्या अद्ययावतीकरण व इतर सुविधांसाठीही पाठपुरावा होत आहे, अशी माहिती राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी दिली.
क्रीडाविषयक पायाभूत सुविधा निर्माण करणे, नागरिक व खेळाडूंना सराव, प्रशिक्षण, व्यायाम यासाठी अद्ययावत क्रीडा सुविधा उपलब्ध करण्यासाठी राज्य शासनाकडून क्रीडा संकुल योजना राबविण्यात येते. तालुका, जिल्हा व विभागीय स्तरावर संकुलाच्या देखभालीसाठी या योजनेत विभागीय क्रीडा संकुलासाठी पहिल्या वर्षासाठी १५ लाख, दुसऱ्या वर्षासाठी १२.५० लाख, तिसऱ्या वर्षासाठी १० लाख, तसेच जिल्हा क्रीडा संकुलासाठी पहिल्या वर्षासाठी १० लाख, दुसऱ्या वर्षासाठी ७.५० लाख, तिसऱ्या वर्षासाठी ५ लाख, तर तालुका क्रीडा संकुलांसाठी प्रतिवर्षी ३ लाख निधी देण्यात येतो. योजनेत क्रीडा संकुलांच्या देखभाल व सुविधा जोपासना आदींसाठी निधी मिळणे आवश्यक होते. त्या अनुषंगाने तत्काळ निधी उपलब्ध करुन द्यावा, या मागणीसाठी पालकमंत्र्यांकडून शासन स्तरावर पाठपुरावा करण्यात आला. त्यानुसार जिल्ह्यातील १० तालुका क्रीडा संकुलांसाठी निधी वितरित करण्यात आला आहे.
धारणी तालुका क्रीडा संकुलासाठी २ लाख ९० हजार रूपये, चांदूर रेल्वे तालुका संकुलासाठी ३ लाख, दर्यापूर, तसेच नांदगाव खंडेश्वर तालुका संकुलासाठी प्रत्येकी ३ लाख, धामणगाव रेल्वे संकुलासाठी २ लाख ९० हजार, अचलपूरसाठी ३ लाख, तिवसा संकुलासाठी २ लाख ३८ हजार, वरूड व मोर्शी येथील संकुलांसाठी प्रत्येकी ३ लाख, चांदूर बाजार संकुलासाठी २ लाख ९० हजार निधी वितरित करण्यात आला आहे. सुविधांची जोपासना, देखभाल, प्रशासकीय बाबी आदींसाठी या निधीचा उपयोग होणार असल्याची माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव यांनी दिली.