अचलपूर मतदासंघात तीन एमआयडीसी उभारणीला मान्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2021 04:13 AM2021-07-30T04:13:13+5:302021-07-30T04:13:13+5:30
अमरावती : जिल्ह्यातील अचलपूर मतदारसंघात उद्योगांसाठी एकही एमआयडीसी नाही. कामगार राज्यमंत्री बच्चू कडू यांनी ही बाब राज्याचे उद्योगमंत्री ...
अमरावती : जिल्ह्यातील अचलपूर मतदारसंघात उद्योगांसाठी एकही एमआयडीसी नाही. कामगार राज्यमंत्री बच्चू कडू यांनी ही बाब राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या लक्षात आणून देताच त्यांनी तीन एमआयडीसीच्या उभारणीला हिरवी झेंडी दाखविली आहे. त्यानुसार तोंडगांव, भूगाव व चांदूरबाजारला एमआयडीसी उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
अचलपूर मतदारसंघातील उद्योगांशी व एमआययडीसींशी संबंधित विषयांवर सुभाष देसाई आणि बच्चू कडू यांच्यात बैठक झाली. अचलपूर मतदारसंघातील तोंडगाव एमआयडीसीसाठी शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी घेण्यात आल्या होत्या. परंतु, या जमिनींवर अद्याप एकाही उद्योगाची उभारणी झालेली नाही. यासंबंधी बच्चू कडू यांनी अमरावतीत एमआयडीसींच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन अचलपूर मतदारसंघातील तोंडगावच्या प्रश्नासह इतर एमआयडीसींचा आढावा घेतला. ज्याप्रमाणे जिल्हा आणि तालुका पातळीवर एमआयडीसी असतात, त्याचप्रमाणे आता २५ हजार लोकसंख्येच्या गावात ग्रामोद्योग केंद्र उभारले जाणार आहे. प्रायोगिक तत्त्वावर १० ते २० एकर जमिनीवर हे ग्रामोद्योग केंद्र असेल. याचा फायदा बचत गट, छोटे कारागीर व कामगारांना होऊन गावातच त्यांना रोजगार उपलब्ध व्हावा, अशी बच्चू कडू यांची संकल्पना आहे. ग्राम विकासाला मोलाचा हातभार लावणारी राज्यमंत्र्यांनी ही स्तुत्य संकल्पना ऐकून उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी त्याला तत्त्वतः मान्यता दिली. तोंडगाव एमआयडीसीत सुपीक जमिनीवर उद्योगच नसल्याने त्या जमिनी परत करण्याची शेतकऱ्यांची मागणी होती. ही मागणी उद्योगमंत्री देसाई यांनी मान्य केली. तसेच उर्वरित जमिनीवर उद्योग उभारण्याच्या हालचालींना वेग देण्याचे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. अमरावती - परतवाडा मार्गावरील भूगाव येथे ३० हेक्टर जमिनीवर एमआयडीसी उभारली जाणार आहे. तसेच चांदूर बाजार हे तालुक्याचे ठिकाण असून ते दक्षिण - उत्तर भागाला थेट रेल्वे मार्गाने जोडले गेले आहे.त्यामुळे चांदूरबाजारला एमआयडीसीचे महत्त्व बच्चू कडू यांनी लक्षात आणून देताच उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी हिरवी झेंडी दाखविली.