धामणगावात पावणेतीन कोटीच्या पाणीटंचाई कृती आराखड्याला मंजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2021 04:14 AM2021-02-11T04:14:25+5:302021-02-11T04:14:25+5:30
धामणगाव रेल्वे : तालुक्यातील ६२ ग्रामपंचायतींमध्ये आगामी तीन टप्प्यांत २ कोटी ७६ लक्ष रुपयांच्या पाणीटंचाई कृती आराखड्याला मंजुरी देण्यात ...
धामणगाव रेल्वे : तालुक्यातील ६२ ग्रामपंचायतींमध्ये आगामी तीन टप्प्यांत २ कोटी ७६ लक्ष रुपयांच्या पाणीटंचाई कृती आराखड्याला मंजुरी देण्यात आली. तिसऱ्या टप्प्यांत २ कोटी ४७ लाखांमध्ये विहीर अधिग्रहण, नवीन विहीर खोलीकरण, हातपंप दुरुस्ती अशी कामे करण्यात येणार आहेत.
स्थानिक पंचायत समिती सभागृहात आमदार प्रताप अडसड यांच्या अध्यक्षतेखाली ही कृती आराखडा बैठक घेण्यात आली. यावेळी तहसीलदार गौरवकुमार भळगटिया, गटविकास अधिकारी माया वानखडे, तालुकाध्यक्ष बाळासाहेब शिरपूरकर यांची उपस्थिती होती. तालुक्यातील दुसऱ्या टप्प्यांत उसळगव्हाण, वडगाव राजदी, वडगाव बाजदी, अशोकनगर, हिंगणगाव, परसोडी, रायपूर कासारखेड या गावांच्या पाणीटंचाईकडे लक्ष दिले जाणार आहे. तिसऱ्या टप्प्यात उर्वरित ६२ गावांत नवीन विहीर खोलीकरण, विहीर अधिग्रहण, दुरुस्ती, गाळ काढणे ही कामे युद्धस्तरावर करण्यात येणार आहे. तालुक्यातील कोणत्याही गावात आगामी काळात पाणीटंचाई निर्माण होऊ नये, यासाठी प्रशासनाने काळजी घ्यावी, असे निर्देश आ. अडसड यांनी दिले. तालुक्यातील पाणीटंचाई व कृती आराखड्यासंदर्भात ग्रामीण पाणीपुरवठ्याचे उपविभागीय अभियंता ए.बी. खासबागे यांनी माहिती दिली. बैठकीला तालुक्यातील सरपंच, ग्रामसेवक, पंचायत समितीचे विस्तार अधिकारी, पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी उपस्थित होते.