राज्यात ८९८ नावीन्यपूर्ण विज्ञान केंद्रे मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2019 01:31 PM2019-08-07T13:31:01+5:302019-08-07T13:32:03+5:30
विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाप्रति ओढ निर्माण व्हावी, यासाठी राज्यात ८९८ नावीन्यपूर्ण विज्ञान केंद्रे मंजूर करण्यात आली आहेत. गट, शहर साधन केंद्रांतर्गत स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडक शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी ही नावीन्यपूर्ण विज्ञान केंद्रे उभारली जातील.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाप्रति ओढ निर्माण व्हावी, यासाठी राज्यात ८९८ नावीन्यपूर्ण विज्ञान केंद्रे मंजूर करण्यात आली आहेत. गट, शहर साधन केंद्रांतर्गत स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडक शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी ही नावीन्यपूर्ण विज्ञान केंद्रे उभारली जातील. त्याकरिता ई-निविदा प्रक्रिया राबविण्यात आली आहे.
समग्र शिक्षा अभियानांतर्गत सन २०१९-२० या वर्षात मराठी आणि उर्दू माध्यमाच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी नावीन्यपूर्ण विज्ञान केंद्रे साकारले जात आहेत. या केंद्रांच्या उभारणीसाठी यू-डायस २०१८-१९ च्या माहितीवरून आणि जिल्हा परिषद, महापालिकेत असलेल्या गट, शहर साधन केंद्रातील अतिरिक्त स्वतंत्र वर्गखोली, विद्युत सुविधा, शाळेची पटसंख्या आदी निकषांना आधारभूत ठेवून नावीन्यपूर्ण विज्ञान केंद्र उभारणीसाठी शाळांची निवड करण्यात आली आहे. ठाणे येथील मीत एंटरप्रायजेस या पुरवठादाराकडून नावीन्यपूर्ण विज्ञान केंद्र उभारणीनंतर गठित समितीमार्फत भेट देऊन साहित्याची पडताळणी करण्यात येणार आहे. समिती पथकाच्या पडतळणीपर्यंतची जबाबदारी पुरवठादार, मुख्याध्यापकांवर असणार आहे. नावीन्यपूर्ण केंद्राचा वापर शाळांनी दररोज करावा, असे राज्य प्रकल्प संचालक वंदना कृष्णा यांनी आदेशाद्वारे स्पष्ट केले आहे. मराठी माध्यमांच्या ७९८, तर उर्दू माध्यमाच्या १०० शाळांसाठी नावीन्यपूर्ण विज्ञान केंद्रे मंजूर करण्यात आली आहेत.
मुख्याध्यापकांकडे जबाबदारी
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये हे केंद्र साकारण्याची जबाबदारी मुख्याध्यापकांवर सोपविली आहे. विद्युत पुरवठ्यासह ५०० चौरस फूट आकाराची आरसीसी स्लॅब असणारी वर्गखोली पुरवठादारास तातडीने उपलब्ध करून द्यावेत, असे मुख्याध्यापकांना कळविले आहे तसेच शाळेत नावीन्यपूर्ण विज्ञान केंद्र उभारणीची प्रक्रिया करताना गणित, विज्ञान विषयाच्या शिक्षकांची नेमणूक करावी लागणार आहे.
जिल्हानिहाय मंजूर केंद्र
अहमदनगर- ३०, अकोला -२४, अमरावती -४५, औरंगाबाद -२२,भंडारा- १४, बीेड- २४, बुलडाणा- ३९, चंद्रपूर- ४५, धुळे- १५, गडचिरोली -२४, गोंदिया- १६, हिंगोली -१०, जळगाव -३२ जालना- १६, कोल्हापूर- ३८, लातूर- २४, मुंबई- २४, नागपूर- ५४, नांदेड -३४, नंदूरबार-१२, नाशिक -३६, उस्मानाबाद- १६, पालघर -१६, परभणी -३०, पुणे -४०, रायगड-३०, रत्नागिरी- १८, सांगली -२२, सातारा-२२, सिंधुदूर्ग- १६, सोलापूर-२६, ठाणे- २४,वर्धा- १६, वाशिम- १२, यवतमाळ- ३२