पाणीटंचाईच्या कामांना ३० एप्रिल ‘डेडलाइन’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2018 10:01 PM2018-04-05T22:01:44+5:302018-04-05T22:01:44+5:30
संभाव्य पाणीटंचाई निवारणासाठी महसूल व ग्रामीण पाणी पुरवठा यंत्रणांनी एकत्रित प्रयत्न करून तत्काळ उपाययोजना कराव्यात. टंचाईची कामे ३१ एप्रिलपूर्वी आटोपावी.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : संभाव्य पाणीटंचाई निवारणासाठी महसूल व ग्रामीण पाणी पुरवठा यंत्रणांनी एकत्रित प्रयत्न करून तत्काळ उपाययोजना कराव्यात. टंचाईची कामे ३१ एप्रिलपूर्वी आटोपावी. पाणी उपलब्धतेबाबत नागरिकांकडून मागणी येण्याची वाट न पाहता सर्व गावांतील जल उपलब्धता तपासून तत्काळ कार्यवाही करण्याचे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी अभिजीत बांगर यांनी गुरूवारी दिले.
उन्हाळा लक्षात घेता संभाव्य पाणीटंचाई, आगामी हंगामातील पीक नियोजन, जलयुक्त शिवार योजना, जलसंधारणाच्या योजना आदी विविध विषयांवर बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. त्यावेळी ते बोलत होते. बृठकीला जिपच्या सीईओ मनीषा खत्री, उपवनसंरक्षक हेमंतकुमार मीना, आरडीसी नितीन व्यवहारे यांच्यासह विविध उपविभागीय अधिकारी, तहसीलदार व अन्य विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
जिल्ह्यात १७८ नळयोजनांच्या कामांना प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे. ४८ तात्पुरत्या पूरक कामांना प्रशासकीय मंजुरी मिळून २३ योजनांचे कायार्रंभ आदेश दिले आहेत. ४३ गावांमध्ये ४९ खासगी विहिरी अधिग्रहित करून पिण्याचे पाणी उपलब्ध करुन देण्यात आले आहे. कामे ३० एप्रिलपूर्वी पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिका-यांनी दिले.
खत, बियाणे, चारा उपलब्धता
खरिपाच्या पूर्वतयारीसाठी बियाणे उपलब्ध असावे म्हणून 'महाबीज'कडे तत्काळ मागणी नोंदविण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. जिल्ह्यात कपाशीचे बीजी-२ हे बियाणे साडेनऊ लाख पाकिटे लागेल, असा अंदाज कृषी विकास अधिकारी उदय काथोडे यांनी सांगितला. बीजी-३ या बियाणे अवैध पद्धतीने विक्रीवर प्रतिबंध आणण्यासाठी जनजागृती करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.
जीओ टॅगींगशिवाय मोबदला देऊ नये
जलसंधारणाची कामे ३० एप्रिलपूर्वी पूर्ण झाली पाहिजेत. जलयुक्त शिवार व जल संधारणाच्या कामांचे जीओ टॅगिंग झाल्याशिवाय कामाचा मोबदला देऊ नये. शेततळ्यांच्या कामासाठी जेसीबी, पोकलँड आदी यंत्रणा प्राधान्याने देण्यात यावी. खारपाणपट्ट्यात वॉटर कपसह शेततळ्यांची कामे गतीने राबवावीत. तहसीलदार व गटविकास अधिकाºयांनी धडकसिंचन विहिरींचा कामनिहाय आढावा घ्यावा. जी कामे सुरू झाली नसतील, ती रद्द करावी, असे निर्देशही त्यांनी दिले.