अनुकंपा नोकरभरतीमधील मनमानीला लागणार ‘ब्रेक’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:11 AM2021-05-29T04:11:14+5:302021-05-29T04:11:14+5:30
अमरावती : बाजार समित्यांची अनुकंपा नोकरभरती आता पणन संचालकांच्या मान्यतेशिवाय होणार नाही. या निर्णयामुळे बाजार समितीत मनमानी पद्धतीने होणाऱ्या ...
अमरावती : बाजार समित्यांची अनुकंपा नोकरभरती आता पणन संचालकांच्या मान्यतेशिवाय होणार नाही. या निर्णयामुळे बाजार समितीत मनमानी पद्धतीने होणाऱ्या अनुकंपा नोकरभरतीला ‘ब्रेक’ लागणार आहे. यासंदर्भात राज्याच्या पणन संचालकांनी ६ मे रोजी आदेश जारी केला.
बाजार समितीत अनुकंपा नोकरभरती करण्याचे अधिकार बाजार समिती प्रशासन आणि जिल्हा उपनिबंधकांना होते. एखादा कर्मचारी कोणत्याही कारणाने दगावल्यास त्याच्या वारसाला बाजार समितीच्या सेवेत तातडीने घेण्यात येत होते. त्यासाठी सचिव आपल्या अधिकारात त्या अनुकंपा कर्मचाऱ्यास नियुक्त करून घेऊन नंतर त्याच्या मंजुरीचा प्रस्ताव जिल्हा उपनिबंधकांकडे पाठवित होते. या नियुक्तीबाबत काही तक्रारी पणन संचालकांकडे झाल्या होत्या. त्यानुसार बाजार समित्यांची नियंत्रक अधिकारी या नात्याने अनुकंपा तत्त्वावरील कर्मचाऱ्यांची नियुक्ती यापुढे राज्याच्या पणन संचालकांच्या मान्यतेशिवाय करण्यात येणार नाही. यापुढे बाजार समित्यांमध्ये अनुकंपा तत्त्वावरील नोकरभरती करीत असताना समितीवर मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. अशा भरतीचा प्रस्ताव जिल्हा उपनिबंधकांच्या मान्यतेने पणन संचालकांकडे सादर करावा लागणार आहे. त्या प्रस्तावातील जागा एकूण पदांच्या २० टक्क्यांपेक्षा अधिक नसाव्या. बिंदूनामावलीप्रमाणे नोकर भरती झालेली आहे की नाही, त्याबाबत मागासवर्गीय कक्ष किंवा सक्षम अधिकाऱ्यांकडून प्रमाणित केलेल्या अहवाल सादर करावा लागणार आहे. यांसह अनेक अटी शर्ती या नोकरभरतीसाठी लागू करण्यात आल्या आहेत.
बॉक्स
पदोन्नतीच्या पदांचा लाभ नाही
वरिष्ठ कर्मचाऱ्यांची काही पदे पदोन्नतीची असल्याने अनुकंपाचा लाभ अधिकाऱ्यांच्या वारसांना देता येणार नाही. दिवंगत कर्मचाऱ्याकडे बाजार समितीची कोणत्याही स्वरूपाची थकबाकी असता कामा नये. गैरव्यवहारात सापडलेल्या कर्मचाऱ्यांच्या नातेवाइकास अनुकंपा तत्त्वावरील योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
कोट
कृषिउत्पन्न बाजार समित्यांमधील अनुकंपा तत्त्वावरील नियुक्तीबाबत वरिष्ठ स्तरावर देण्यात आलेल्या आदेशानुसार बाजार समित्यांना याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.
- संदीप जाधव, जिल्हा निबंधक