विमा कंपन्यांच्या मनमानीला ब्रेक : नुकसानाच्या प्रस्तावासाठी सहा पर्याय!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2021 04:17 AM2021-09-16T04:17:27+5:302021-09-16T04:17:27+5:30
शेतकऱ्यांना दिलासा : नुकसानाची माहिती विमा कंपनीकडे सादर करणे झाले सुकर ! अमरावती : नैसर्गिक संकटामुळे पिकांच्या होणाऱ्या नुकसानीमुळे ...
शेतकऱ्यांना दिलासा : नुकसानाची माहिती विमा कंपनीकडे सादर करणे झाले सुकर !
अमरावती : नैसर्गिक संकटामुळे पिकांच्या होणाऱ्या नुकसानीमुळे मदत मिळावी, यासाठी शेतकरी मोठ्या प्रमाणात विमा काढतात. दरम्यान, याबाबत विमा कंपन्यांच्या अटी-शर्ती असल्यामुळे अनेक शेतकरी विम्याच्या लाभापासून वंचित राहतात. या सर्व विमा कंपन्यांच्या मनमानीला ब्रेक लागणार असून, आता कृषी आयुक्तालयाकडून सुचविलेल्या सहा पर्यायांद्वारे शेतकरी विमा कंपन्यांना नुकसानाबाबत पूर्वसूचना देऊ शकणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना घटना घडल्यापासून ७२ तासांच्या आत विमा संरक्षित पिकाचे नुकसान झाले असल्यास त्याबाबत पूर्वसूचना मोबाईल ॲपद्वारे नोंदणी करून प्रस्तावासाठी सादर करावे लागणार आहे.
बॉक्स
हे आहेत पर्याय
क्रॉप इन्शुरन्स ॲप
विमा कंपनीचा टोल फ्री क्रमांक
विमा कंपनीचा ई-मेल
विमा कंपनीचे तालुकास्तरीय कार्यालय
कृषी विभागाचे मंडळ कृषी कार्यालय
ज्या बँकेत विमा जमा केला, ती बँक शाखा
बॉक्स
आधी हे होते दोन पर्याय
मोबाइल ॲपद्वारे ज्या शेतकऱ्यांनी विमा काढला आहे, ते शेतकरी संबंधित विमा कंपन्यांच्या भ्रमणध्वनीवर कॉल करून नुकसानाची सूचना देत होते. मात्र, भ्रमणध्वनीवर संपर्क होत नसल्यास अनेक शेतकऱ्यांची नोंद होत नव्हती. नुकसानाबाबत माहिती ॲपमध्ये नुकसानीचे फोटो अपलोड करून माहिती सादर करण्यात येत होती.
बॉक्स
चार हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान
जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात ६, ७ व ८ सप्टेंबर रोजी अतिवृष्टीने १९८ गावांमधील ३ हजार ६९९ हेक्टर क्षेत्रावरील पिके बाधित झाली असल्याचा प्राथमिक अंदाज आहे तसेच जुलै महिन्यातही जिल्ह्यात ढगफुटी सदृश पाऊस झाल्याने प्रचंड नुकसान झाले होते. या नुकसानीचे सर्वेक्षण करण्यात येत आहे. संबंधित विमा कंपनीला देणे आवश्यक आहे. मात्र, काही शेतकऱ्यांकडे स्मार्ट मोबाईल नसल्यामुळे तसेच नेटवर्क, सर्व्हर डाऊन अशा विविध समस्यांमुळे शेतकरी नुकसानाची पूर्वसूचना देऊ शकत नाही. त्यामुळे विम्याच्या लाभापासून वंचित राहण्याची शक्यता आहे. या सर्व बाबींना आता ब्रेक लागणार आहे.
कोट
नुकसानभरपाईसंदर्भात कृषी विभागाने जाहीर केलेल्या प्रक्रियेमुळे शेतकऱ्यांना कुठलीही अडचण न येता सुलभ आणि सहजरीत्या माहिती देणे यामुळे सोईचे झाले आहे. नुकसान झाल्यास या सुविधांचा वापर करावा.
- प्रीती रोडगे, विभागीय सांख्यिकी अधिकारी