अमरावती जिल्ह्यातील रोहिणीखेड्यापाठोपाठ गौलानडोह येथेही आढळल्या पुरातन वस्तू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2021 11:35 AM2021-01-28T11:35:12+5:302021-01-28T11:35:53+5:30

Amravati News धारणी तालुक्यातील गौलानडोह या गावातील मजूर रोजगार हमी योजनेच्या कामाकरिता १५ जानेवारी रोजी गावालगत असलेल्या टेकड्यांमध्ये खोदकाम करीत असताना पुरातन काळातील बांगड्या आढळल्याची माहिती आहे.

Archaeological sites were also found at Goulandoh after Rohini Kheda in Amravati district | अमरावती जिल्ह्यातील रोहिणीखेड्यापाठोपाठ गौलानडोह येथेही आढळल्या पुरातन वस्तू

अमरावती जिल्ह्यातील रोहिणीखेड्यापाठोपाठ गौलानडोह येथेही आढळल्या पुरातन वस्तू

Next

 श्यामकांत पाण्डेय 

लोकमत न्यूज नेटवर्क 

अमरावती : धारणी तालुक्यातील गौलानडोह या गावातील मजूर रोजगार हमी योजनेच्या कामाकरिता १५ जानेवारी रोजी गावालगत असलेल्या टेकड्यांमध्ये खोदकाम करीत असताना पुरातन काळातील बांगड्या आढळल्याची माहिती आहे. ही बांगडी पोलिस पाटलाच्या मुलीकडे असून, खोदकाम करणारा युवक अर्धविक्षिप्त झालेला आहे . त्याच्यावर तंत्र-मंत्रच्या साहाय्याने उपचार सुरू असून, हे प्रकरण गावस्तरावर दाबण्याचा प्रयत्न सुरू आहे.

प्रजासत्ताक दिनी दुपारी ३ वाजता सदर प्रतिनिधीने गौलानडोह गाठून पाहणी केली असता, तो २० वर्षीय अर्धविक्षिप्त युवक आर्थिक विपन्नावस्थेत इतर दोन भाऊ व विधवा आई सोबत कसेबसे जीवन जगत असल्याचे आढळले. खोदकामापासूनच त्याच्या डोक्यावर विपरीत परिणाम झाल्याचे कुटुंबीयांनी सांगितले. त्यासाठी स्थानिक उपचारकर्त्याकडून तोडगे आणले जात असल्याचे त्यांनी सांगतिले. आपला मुलगा बरा व्हावा, यात सारे काही आले, असे केविलवाणा चेहरा करीत त्याच्या विधवा आईने सांगितले.

खोदकामदरम्यान पाच बांगड्या आढळल्याचे अर्धविक्षिप्त अवस्थेला पोहोचलेल्या तरुणाने सांगितले . मात्र, ही बांगडी तिच्या पाठीमागे काम करीत असलेल्या पोलीस पाटलाच्या मुलीने ठेवून घेतल्या. दुसऱ्या दिवशीसुद्धा पोलीस पाटलाने त्याला संबंधित घटनास्थळावर घेऊन जाऊन अधिक खोदकाम केले असता, पुन्हा काही वस्तू आढळल्याचे त्याने सांगितले. तथापि, ते नेमके काय, याचे गुपित बाहेर आलेले नाही .

ज्या दिवशी खोदकाम झाले, त्या दिवसापासून तो युवक सैरावैरा पळू लागला होता. त्याला गावातील मांत्रिकाकडून उपचार करून काही प्रमाणात बरे झाल्याची माहिती त्याने स्वतः दिली.

खोदकामादरम्यान प्राप्त झालेल्या बांगडीबाबत चौकशी केली असता, रोजगार सेवकाकडे त्या बांगड्या पोलीस पाटलांनी दिल्याची माहिती मिळाली. रोजगार सेवक घरी आढळून आला नाही . परंतु, कुटुंबीयांनी त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारचे खोदकामतील वस्तू नसल्याचे सांगितले . याउलट गावातील अन्य एका व्यक्तीचे नाव त्यांनी घेतले. याबाबत पोलीस पाटलाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, तेही गावात आढळून आले नाही . त्यामुळे याप्रकरणी त्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही. संबंधित बीटच्या पोलीस अधिकाऱ्याला याबाबत कळविण्यात आले असले तरी वृत्त लिहीपर्यंत कोणत्याही प्रकारची कारवाई झालेली नाही.

मोगलकालीन नाणी

यापूर्वीसुद्धा रोहिणीखेडा या गावात खोदकामादरम्यान मोगलकालीन चलन प्राप्त झाले होते. त्याची शाई मावळण्यापूर्वीच गौलानडोह या गावातसुद्धा गुप्तधन मिळाल्याची अफवा जोरात सुरू आहे. याबाबत गावामध्ये तणाव असून, दबक्या आवाजात सर्व गावकरी या घटनेला दुजोरा देतात. आता याकडे पोलीस प्रशासन कशा प्रकारची कारवाई करते, याची सर्वांना प्रतीक्षा आहे.

गौलानडोह येथील खोदकामात मिळालेली बांगडी ही पोलीस पाटलाकडून ताब्यात घेण्यात आली आहे . सदर धातूची सोनाराकडून तपासणी करून घेतली. हा कांस्य धातू असून, अंदाजे वीस ते पंचवीस वर्षे जुने आहे . याप्रकरणी संबंधित यांचे बयान नोंदविण्यात आले असून, सदरहू जप्त केलेली बांगडी महसूल विभागाकडे सुपूर्द करण्यात येणार आहे.

- प्रशांत गीते , सहायक पोलीस निरीक्षक, धारणी

Web Title: Archaeological sites were also found at Goulandoh after Rohini Kheda in Amravati district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :historyइतिहास