'सुपर'मध्ये उपचार घेताय का? औषधी बाहेरुनच घ्या!; फतवा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2024 04:05 PM2024-05-10T16:05:44+5:302024-05-10T16:08:23+5:30
मेडिकल स्टोअरकडे धाव : ओपीडीत रोज २०० ते २५० रुग्ण
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय (सुपर स्पेशालिटी) येथे उपचारासाठी दाखल होणारे बहुतांश रुग्ण आर्थिकदृष्ट्या माघारलेले वा अतिशय सामान्य पातळीवरील असतात. आरोग्यसेवा मोफत करण्यात आल्याने हर्षभरित झालेल्या या रुग्णांना जेव्हा बाहेरून औषध आणण्यासाठी खिशाला कात्री लागते तेव्हा त्यांना होणाऱ्या वेदना आजारापेक्षा दुःखदायी असतात. या स्थितीमुळे 'सुपर'मध्ये औषधांचा तुटवडा आहे का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयातील ओपीडी तसेच भरती असलेल्या रुग्णांना डॉक्टरांनी लिहून दिलेल्या काही औषधी रुग्णालयातून दिली जातात, तर काही औषधी ही उपलब्ध नसल्याचे सांगून ती बाहेरून आणण्याचे सांगण्यात येत आहे. येथे हृदयविकार, कर्करोग, किडनीसंदर्भातील आजार तसेच लहान बालकांच्या विविध आजारांवरील शस्त्रक्रिया केल्या जात आहेत. त्यामुळे येथे अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यांतून रोज शेकडो रुग्ण उपचारासाठी दाखल होत असतात. अनेक रुग्ण या ठिकाणी रेफरदेखील केले जातात. ओपीडीमध्येही दररोज सरासरी २०० ते २५० रुग्ण तपासणीसाठी येतात. राज्य शासनाच्या धोरणानुसार या रुग्णांना सर्व प्रकारची आरोग्यसेवा तसेच औषधी मोफत उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. परंतु, सुपर स्पेशालिटी येथील डॉक्टरांनीच लिहून दिलेली औषधीच रुग्णालयातील औषध भंडारमध्ये उपलब्ध नसल्याने बहुतांश रुग्णांना बाहेरून औषधी विकत आणावी लागते.
एकाच रुग्णाचा दोन वेळा सिटी स्कॅन
विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय येथे कॅन्सर तसेच इतर आजारांच्या निदानासाठी बहुतांश रुग्णांना सिटी स्कॅन करण्याचा सल्ला दिला जातो. परंतु, रुग्णालयात सिटी स्कॅन असतानादेखील ते बंद असल्याचे सांगून रुग्णांना बाहेरून सिटी स्कॅन करण्यास सुचविले जाते. एकाच रुग्णाचा दोन वेळा सिटी स्कॅन करण्यात येत असल्याचा प्रकारही रुग्णालयात पाहायला मिळत आहे. एका महिला रुग्णाचे सोमवारी सिटी स्कॅन केल्यानंतर तिला दुसऱ्या दिवशी अहवाल घेण्यासाठी बोलविण्यात आले होते. परंतु, मंगळवारी अहवाल घेण्यासाठी आलेल्या महिलेला सिटी स्कॅन चुकल्याने पुन्हा सिटी स्कॅन करण्यास सांगण्यात आले.