टाटा, बिर्लाची औलाद आहात का?
By admin | Published: July 2, 2017 12:04 AM2017-07-02T00:04:28+5:302017-07-02T00:04:28+5:30
कर्जासंर्दभात शेतकरी भेटायला आल्यास त्यांच्या अंगावर कागदपत्रे भिरकवता, स्वत:ला काय टाटा, बिर्लाची औलाद समजता काय? हे विसरू नका,....
पालकमंत्री बँकर्सवर संतापले : १० हजारांच्या कर्ज वाटपास ५ जुलै ‘डेडलाईन’
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : कर्जासंर्दभात शेतकरी भेटायला आल्यास त्यांच्या अंगावर कागदपत्रे भिरकवता, स्वत:ला काय टाटा, बिर्लाची औलाद समजता काय? हे विसरू नका, तुम्हीदेखील शेतकऱ्यांची मुलं आहात. शेतकऱ्यांशी सौजन्याने वागा, चांगले बोला. कुठल्याही परिस्थितीत पाच जुलैच्या आत पात्र शेतकऱ्यांना दहा हजारांचे कर्जवाटप झालेच पाहिजे. नंतर मी शांत बसणार नाही, अशा कठोर शब्दांत पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी शनिवारी खरीप पीककर्ज वाटपाच्या बैठकीत बँक अधिकाऱ्यांना खडेबोल सुनावले.
भातकुली तालुक्यातील विनोद भटकरसहित काही शेतकरी पीक कर्जासंर्दभात स्टेट बँक आॅफ इंडियाच्या अधिकाऱ्यांना भेटले असता त्यांच्याशी संवाद न साधता, शेतकऱ्यांच्या अंगावर कागदपत्रे भिरकवल्याच्या प्रकारामुळे पालकमंत्री चांगलेच संतापले. शासनाने तातडीचे कर्ज वाटपासाठी १४ जूनला जीआर काढला, आता एक जुलै आहे, एकाही शेतकऱ्यांना तातडीचे कर्जवाटप झालेले नाही. राज्याचे मुख्यमंत्री शेतकऱ्यांच्या मदतीसाठी तातडीचे निर्णय घेत असताना त्याच्या अंमलबजावणीची जबाबदारी सर्वांची आहे. शासनाने हमी घेतली असताना कर्जवाटप झालेच पाहिजे. लगतच्या अकोला जिल्ह्यात बँकांनी शेतकऱ्यांना कर्जवाटप सुरू केले आहे. बँक अधिकाऱ्यांच्या हृदयातील ओलावा कमी होत आहे. प्रत्येक अडचणीतून मार्ग काढण्याची मानसिकता पाहिजे, असे सांगत पालकमंत्र्यांनी बँक अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांशी केलेल्या उद्दामपणाचे उदाहरणे देऊन उपस्थित बँक अधिकाऱ्यांना या उर्मठपणाचा जाब विचारला.
जिल्ह्यात खरिपाचे कर्जवाटपात प्रगती नसल्याबाबत सर्व बँक अधिकाऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी खडे बोल सुनावले.शासनाने शेतकऱ्यांना वाटप करायच्या १० हजारांच्या कर्जाची हमी घेतली असतांना कुठल्याही परिस्थितीत शेतकऱ्यांना तातडिच्या स्वरूपात कर्ज वाटप झालेच पाहीजे, २४ तासाच्या आत कर्जवाटप सुरू करा, यासंबधी तुमच्या वरिष्ठांची संवाद साधा,मात्र कुठल्याही परिस्थितीत कर्ज वाटप झालेच पाहिजे, असी तंबी जिल्हाधिकारी अभिजीत बांगर यांनी दिली. शासनाचे कर्जमाफीच्या निर्णयानंतर जिल्ह्यात किमान तीन लाखांवर शेतकरी कर्जसाठी पात्र असताना केवळ २७ हजार शेतकऱ्यांना कर्जवाटप करण्यात आले आहे. एक लाख ६७ हजार थकबाकीदार शेतकरी कर्ज मिळण्यासाठी पात्र आहेत.
लाख नवे खातेदार आहेत, तर ४३ हजार शेतकरी नियमित खातेदार आहेत. दीड लाखांचे कर्ज शासनाने माफ केल्याने या निकषातील शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणे ही पहिली जबाबदारी, दीड लाखांवर कर्ज असनाऱ्या शेतकऱ्यांचे शासन निर्णयाप्रमाणे वनटाईम सेटलमेंट करणे व ज्या शेतकऱ्यांनी नियमित कर्जाचा भरणा केलेला आहे. त्या शेतकऱ्यांना त्यांना २५ हजारापर्यंत मदतीचा दिलासा मिळायला हवा, यासर्व बाबी तातडीने पूर्ण कराव्यात आदी सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी केल्या.
उद्रेक झाल्यास बँकअधिकाऱ्यांवर एफआयआर
शेतकऱ्यांना तातडीने १० हजारांच्या कर्जाचे वाटप झालेच पाहिजे,कधी पर्यत वाटणार आताच सांगा?आम्हाला सुचना नाहीत हे चालणार नाही,शासन निर्णय झाला, शासनाने हमी घेतली तरी किती दिवस वरिष्ठांसी संवाद साधणार, शासन निर्णयाची अंमलबजावणी झालीच पाहिजे.प्रत्येक बँकांना पत्र दिले, बँक अधिकाऱ्यांची बैठक झाली, संवाद झाला, अश्या स्थितीत कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास पहिला एफआयआर बॅकर्सवर दाखल करू, असी तंबी जिल्हाधिकारी अभिजीत बांगर यांनी कर्ज वाटपाच्या बैठकीत दिली.कर्जवाटपाचा रोजचा लेखाजोखा डिडीआर व एलडीएम यांनी सादर करावा,असे निर्देश त्यांनी दिले.