चिखलदऱ्यात कुऱ्हाडीचे घाव घालून एकाची हत्या; परिजनांचा आक्रोश, दोन मुले पित्याला मुकली
By प्रदीप भाकरे | Published: November 4, 2022 04:59 PM2022-11-04T16:59:00+5:302022-11-04T17:00:32+5:30
शेतात गुरे चारण्याच्या पैशांवरून वाद; आरोपीस अटक
चिखलदरा (अमरावती) : शेत गुरे चराईसाठी दिले, त्याचे तीन हजार रुपये दिले नसल्याच्या वादातून दारूच्या नशेत कुऱ्हाडीने डोक्यासह तोंडावर सपासप वार करून हत्या करण्यात आल्याची घटना तालुक्यातील जामली आर येथे सकाळी ११ वाजता घडली. या घटनेने पंचक्रोशीत एकच खळबळ उडाली आहे.
पोलीस सूत्रांनुसार, ईश्वर रमेश चव्हाण (३२, रा. जामली आर) असे मृताचे नाव आहे. हत्याप्रकरणी आरोपी हिरालाल रामा जामूनकर (५९, रा. जामली आर) याला पोलिसांनी ताब्यात घेतले. घटनेत एकापेक्षा अधिक आरोपी असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
ईश्वर चव्हाण हा गवळी समाजाचा असून त्याचा दूध व पशुपालनाचा व्यवसाय आहे. आरोपी हिरालाल जामूनकर याचे शेत त्याने पाळीव गुरांच्या चराईसाठी तीन हजार रुपयात घेतले होते. ही रक्कम मागितल्यावरसुद्धा दिली नसल्याने दोघांमध्ये वाद झाला. शुक्रवारी सकाळी ११ वाजता दोघे दारूच्या नशेत असताना आरोपी हिरालालने कुऱ्हाडीने वार करून ईश्वरची हत्या केली.
घटनेची माहिती मिळताच चिखलदरा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक शहाजी रूपनर, उपनिरीक्षक दिनेश तायडे, जमादार विनोद ईसळ, प्रभाकर चव्हाण, अर्जुन केंद्रे, श्रीकांत खानंदे, आनंद देवकते, आशिष वरघड, संदीप देवकते आदींच्या चमूने घटनास्थळी जाऊन पंचनामा केला व आरोपीला अटक केली.
कुटुंबावर कोसळले आभाळ, दोन मुले पित्याला मुकली
हत्या झाल्याचे कळताच घटनास्थळी गावातील व परिसरातील नागरिकांनीही एकच गर्दी केली होती. परिजनांचा आक्रोश होता. मृतक ईश्वर चव्हाण याला आठ व दहा वर्षाची दोन मुले आहेत. ईश्वर चव्हाण हा गुरुवारी अचलपूर येथील बाजार समितीत शेतातून निघालेले सोयाबीन विकून आला होता. त्याचे पैसेसुद्धा त्याच्याजवळ होते. आरोपी व मृतामध्ये नेमका वाद शेतावरून झाला की अन्य काही कारण, यासंदर्भात पोलीस तपास करीत आहेत. वृत्त लिहिस्तोवर पंचनामा सुरू होता.