पूर्व वैमनस्यातून दोन गटांत सशस्त्र चकमक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2019 12:56 AM2019-01-04T00:56:56+5:302019-01-04T00:58:16+5:30
डिप्टी ग्राऊंडमधील दगडफेक व तलवारी उगारण्याच्या घटनेची शाई वाळते न वाळते तोच बुधवारी रात्री १२ नंतर नूरानी चौकात दोन गटांत सशस्त्र चकमक उडाली. प्रचंड दगडफेक करण्यात आली. या चकमकीत एक जण गंभीर जखमी झाला.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : डिप्टी ग्राऊंडमधील दगडफेक व तलवारी उगारण्याच्या घटनेची शाई वाळते न वाळते तोच बुधवारी रात्री १२ नंतर नूरानी चौकात दोन गटांत सशस्त्र चकमक उडाली. प्रचंड दगडफेक करण्यात आली. या चकमकीत एक जण गंभीर जखमी झाला. या चकमकीदरम्यान एका चारचाकी वाहनाची नासधूस करण्यात आली. पोलिसांनी सात जणांना अटक केली असून, परस्परविरोधी तक्रारींवरून दोन गटांतील १९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलीस सूत्रानुसार, सन २०१४ मध्ये झालेल्या एका हत्याप्रकरणाची गुरुवारी स्थानिक न्यायालयात सुनावणी होणार होती. या प्रकरणात मो. रशीद शाह हा साक्षीदार आहे. तो बुधवारी रात्री हैदरपुरा येथील घरानजीक एका पानटपरीवर असताना त्यास धमकावण्यात आले. यावेळी झडलेल्या वादादरम्यान अब्दुल सलीम व अब्दुल हबीब या दोघांनी रशीदच्या डोक्यावर पाइपने वार केला तसेच घराच्या दारावर तलवार मारली. दोन गट समोरासमोर ठाकले. सुमारे अर्धा तास दगडफेक करण्यात आली. या घटनेने अफरातफर माजली. जखमी रशीद शाहला तत्काळ इर्विनला हलविण्यात आले.
बघ्यांपैकी कुणीतरी घटनेची माहिती नागपुरीगेट पोलिसांना दिली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अतिरिक्त पोलीस कुमक व क्यूआरटी पथक तैनात करण्यात आले. याप्रकरणी दोन्ही गटांतील प्रत्येकी तीन जणांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये अ. हबीब, अ. नईम, अ. सलीम, अनिस ऊर्फ अन्नूसह दुसऱ्या गटातील सोनू शाह, मोनू शाह, हाजी रफिक शाह यांचा समावेश आहे. यादरम्यान नूराणी चौक परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. एसआरपीएफ व अन्य ठाण्यांतील कुमक बोलावण्यात आली. दोन्ही उपायुक्तांसह ठाणेदारांनी घटनास्थळी भेट दिली. रशीदच्या चारचाकीची तोडफोड केली असून, पोलिसांनी तलवार व फरशा जप्त केला. १९ जणांविरुद्ध कलम १४७, १४८, १४९, ४५२, ३२६ अन्वये गुन्हे दाखल केले आहेत.
सर्च आॅपरेशन
याप्रकरणी सात आरोपींना अटक करण्यात आली. अन्य आरोपींच्या शोधार्थ हैदरपुरा व नजीकच्या परिसरात बुधवारी रात्री व गुरुवारी दिवसभर सर्च आॅपरेशन राबविण्यात आले. गुरुवारी दिवसभर हैदरपुरा व नूरानी चौक परिसराला पोलीस छावणीचे स्वरूप होते.
सात आरोपींना अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने त्यांना ७ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. जुन्या वैमनस्यातून ही घटना घडली.
- दिलीप चव्हाण, ठाणेदार नागपुरी गेट पोलीस ठाणे