गुरुदासबाबा मंदिरात सशस्त्र दरोडा, महाराजांना मारहाण, दीड लाखांची रोकड लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2019 06:52 PM2019-08-12T18:52:45+5:302019-08-12T18:52:57+5:30
मार्डी येथे गुरुदास महाराज यांचा प्रसिद्ध मठ आहे.
तिवसा : अमरावती येथील तिवसा तालुक्यात असलेल्या कु-हा पोलीस ठाण्याच्या हद्दीत मार्डी येथील प्रसिद्ध गुरुदासबाबा मंदिरात रविवारी रात्री सात ते आठ दरोडेखोरांनी तलवारीच्या धाकावर धुमाकूळ घातला. गुरुदास महाराजांना मारहाण केली तसेच दीड लाखांची रोकड, सोन्याच्या चार अंगठ्या लंपास केल्या. रात्रीच जिल्हा पोलीस अधीक्षक पोलीस उपअधीक्षक व बडे पोलीस अधिकारी यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. या घटनेने तालुक्यात खळबळ उडाली आहे.
मार्डी येथे गुरुदास महाराज यांचा प्रसिद्ध मठ आहे. येथे दर गुरुवारी व रविवारी सत्संग भरतो. जिल्हाभरातील भाविक महाराजांच्या दर्शनासाठी येत असतात. रविवारी रात्री या ठिकाणी मंदिरात प्रार्थना सुरू असताना चारचाकी वाहनातून सात ते आठ दरोडेखोरांनी आत प्रवेश केला. गुरुदास महाराज म्हणून नावाजलेले सुनील ऊर्फ गुरुदास जानराव कावलकर (४१, रा. मार्डी) यांना जबर मारहाण केली. प्रत्येकी एक तलवारीच्या हदशतीत दरोडेखोरांनी महाराजांच्या डोक्यावर पाण्याने भरलेला माठ फोडला व त्यांच्या खोलीत प्रवेश करीत कपाटातील दीड लाखांची रोकड, चार सोन्याच्या अंगठ्या असे साहित्य लंपास केले.
हल्ल्यात महाराज किरकोळ जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच कु-हा पोलिसांनी ठाणेदार सचिन जाधव यांच्या नेतृत्वात घटनास्थळ गाठले व पंचनामा केला. जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. हरिबालाजी एन., जिल्हा पोलीस उपअधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिका-यांनी घटनास्थळाची पाहणी केली. पोलिसांनी रात्रीच जिल्हाभरात नाकाबंदी करून दरोडेखोरांचा शोध घेतला. पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध भादंविच्या कलम ३९५, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
घटनेची माहिती मिळताच आम्ही घटनास्थळ गाठून पंचनामा केला. यात अद्याप कोणीही आरोपी सापडला नाही. मात्र, घटनेचा वेगवेगळ्या प्रकारे तपास सुरू आहे.
- सचिन जाधव, पोलीस निरीक्षक, कु-हा ठाणे