परतवाड्यात सशस्त्र दरोडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2019 11:36 PM2019-05-06T23:36:50+5:302019-05-06T23:37:23+5:30
शहराच्या मध्यवस्तीतील आॅइल मिल व्यापाऱ्याच्या घरावर रविवारी मध्यरात्रीनंतर सशस्त्र दरोडा घालण्यात आला. सहा दरोडेखोरांनी अडीच लाख रुपये व दागिने असा तब्बल २१ लाखांचा ऐवज लुटला.
लोकमत न्यूज नेटवर्क
परतवाडा : शहराच्या मध्यवस्तीतील आॅइल मिल व्यापाऱ्याच्या घरावर रविवारी मध्यरात्रीनंतर सशस्त्र दरोडा घालण्यात आला. सहा दरोडेखोरांनी अडीच लाख रुपये व दागिने असा तब्बल २१ लाखांचा ऐवज लुटला.
बसस्थानक मार्गावर कश्यप पेट्रोल पंपासमोर राहणारे विवेक मुरलीधर अग्रवाल (५७) यांच्या घरी दरोडा पडला. रविवारी मध्यरात्री ३ च्या सुमारास अग्रवाल कुटुंब गाढ झोपेत असताना सहा दरोडेखोर त्यांच्या घरात शिरले. विवेक अग्रवाल, त्यांच्या पत्नी आणि आई सुधा अग्रवाल यांना झोपेतून उठवत दरोडेखोरांनी त्यांना लोखंडी रॉड व चाकूचा धाक दाखवून रोख रक्कम व दागिन्यांची मागणी केली.
अग्रवाल दाम्पत्य व त्यांच्या आईचे हात कापड व दोरीने बांधून त्यांनी घरात हैदोस घातला. कपाटात असलेली अडीच लाखांची रोकड व सोन्या-चांदीचे दागिने असा एकूण २० लाख ७८ हजार रुपयांचा ऐवज घेऊन ते पसार झाले.
वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी
कुटुंबीयांना कसाबसा धीर देत अग्रवाल यांनी दरोड्याची माहिती पोलिसांना दिली. गस्तीवर असलेले पोलीस पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. नाकाबंदी करण्यात आली. श्वानपथक व ठसेतज्ज्ञाला पाचारण करण्यात आले. पोलिसांच्या श्वानाने घटनास्थळाच्या मागील बाजूस असलेल्या शांती दाल मिलच्या दिशेने धाव घेतली. यादरम्यान रस्त्यात पडलेले दहा हजारांचे बंडल पोलिसांच्या हाती लागले. अपर पोलीस अधीक्षक श्याम घुगे यांनीही घटनास्थळी भेट दिली तथा अधिनस्थांना सखोल चौकशीचे आदेश दिले. या दरोड्याने शहरात दहशत पसरली होती.
असा आहे घटनाक्रम
पोलिसांनुसार, रविवारी मध्यरात्री ३ च्या सुमारास घराचा मागील दरवाजा व ग्रील तोडून दरोडेखोर आत शिरले. त्यांनी सर्वप्रथम पहिल्या बेडरूमचा दरवाजा बाहेरून बंद केला. त्यामध्ये विवेक अग्रवाल यांचा मुलगा विनय हा झोपलेला होता. नंतर हे दरोडेखोर विवेक व अवंतिका अग्रवाल या दाम्पत्याच्या बेडरूमसह सुधा अग्रवाल (८५) यांच्याकडे वळले. तिघांचेही हातपाय दोरीने बांधण्यात आले तसेच त्यांना लोखंडी रॉड व चाकूचा धाक दाखवून ऐवज लुटला.
दरोडेखोरांनी मागितल्या चाव्या
अग्रवाल कुटुंबाला ओलीस ठेवत दरोडेखोरांनी त्यांना चूपचाप पडून राहण्यास सांगितले. विवेक अग्रवाल यांना घरातील तिजोरीच्या चाव्या मागितल्या. दरोडेखोर ‘पैसे दो, पैसे दो’ असे ओरडत होते. या दरोड्याने अग्रवाल कुटुंबीय भयभीत झाले होते. एक तास हा थरार चालला. मोठा ऐवज मिळाल्यानंतर त्यांनी पळ काढला.
हिंदी भाषिक असल्याचा कयास
तोंडाला कापड बांधलेले ३० ते ३५ वर्षे वयोगटातील सहाही दरोडेखोर हिंदीत बोलत होते. त्यांनी हिंदीतच अग्रवाल यांना दरडावले. त्या दरोडेखोरांपैकी एखाद्याला पळताना दुखापत झाल्याची प्राथमिक माहिती आहे. अग्रवाल यांच्या घराच्या ज्या मागील बाजूने त्यांनी पळ काढला, तेथे रक्ताचे डाग दिसून आलेत.
तपासासाठी चार पथके नेमली आहेत. श्वानपथक व ठसेतज्ज्ञांना पाचारण करण्यात आले. तपासाला वेग देण्यात आला आहे.
- श्याम घुगे, अपर पोलीस अधीक्षक (ग्रामीण)