वायगावात तीन घरांवर सशस्त्र दरोडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2019 09:32 PM2019-03-10T21:32:50+5:302019-03-10T21:33:05+5:30
भातकुली तालुक्यातील वायगाव येथे चार अज्ञात दरोडेखोरांनी तीन घरांवर सशस्त्र दरोडा घातला. चाकूच्या धाकावर ५७ हजारांचा ऐवज लंपास केला. एका ग्रामस्थांवर चाकूने करण्यात हल्ला चढविण्यात आला. हा थरार शनिवारी मध्यरात्री घडला. या दरोड्याने ग्रामस्थांमध्ये एकच खळबळ उडाली. तिघांच्या घरी दरोडा घालून दरोडेखोर पसार झाले. वलगाव पोलिसांनी अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास आरंभला.
लोकमत न्यूज नेटवर्क
टाकरखेडा संभू : भातकुली तालुक्यातील वायगाव येथे चार अज्ञात दरोडेखोरांनी तीन घरांवर सशस्त्र दरोडा घातला. चाकूच्या धाकावर ५७ हजारांचा ऐवज लंपास केला. एका ग्रामस्थांवर चाकूने करण्यात हल्ला चढविण्यात आला. हा थरार शनिवारी मध्यरात्री घडला. या दरोड्याने ग्रामस्थांमध्ये एकच खळबळ उडाली. तिघांच्या घरी दरोडा घालून दरोडेखोर पसार झाले. वलगाव पोलिसांनी अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास आरंभला.
वायगाव येथील मधुकर लक्ष्मणराव वरठे, लक्ष्मण सरदार, प्रमोद समाधान हरणे या तिघांच्या घरावर शनिवारी रात्री दोन वाजताच्या सुमारास अज्ञात चौघांनी दरोडा घातला. तिन्ही घरे एकमेकांच्या बाजुला आहेत. चाकुच्या धाकावर या तिन्ही घरांमधून ३० हजार ५० रुपयांसह २७ हजारांचे दागिने असा ५७ हजारांचा ऐवज घेऊन दरोडेखोर पसार झाले.
मधुकर लक्ष्मण वरठे यांनी दरोडेखोरांचा प्रतिकार केला असता, त्यांच्यावर हल्ला चढविला. यात वरठे यांच्या हाताला चाकू लागला. याची माहिती तत्काळ पोलिसांना देण्यात आली. डीसीपी प्रदीप चव्हाण यांच्यासह वलगावचे ठाणेदार मोहन कदम अधिनिस्थ यंत्रणेसह रविवारी वायगावात दाखल झाले. ठसे तज्ज्ञ, श्वानपथकास यावेळी पाचारण करण्यात आले होते.
याप्रकरणी दरोड्याचा गुन्हा दाखल केला. सन २०१५ मध्ये याच पद्धतीचा एक गुन्हा घडला होता. त्याच घटनेतील आरोपींनी हा गुन्हा केला असावा, अशी शक्यता आहे. परजिल्ह्यातील टोळीचा समावेश असू शकतो.
- यशवंत सोळंके,
उपायुक्त