दर्यापुरातील मोमीनपुरा भागातून शस्त्रसाठा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2023 10:05 PM2023-01-21T22:05:28+5:302023-01-21T22:05:57+5:30
Amravati News दर्यापूर येथील मौलाना आझाद उर्दू हायस्कूल लगतच्या मोमीनपुरा भागातून पोलिसांनी शनिवारी सायंकाळच्या वेळी धडक कारवाई करीत मोठा शस्त्रसाठा जप्त केला.
अमरावती : दर्यापूर येथील मौलाना आझाद उर्दू हायस्कूल लगतच्या मोमीनपुरा भागातून पोलिसांनी शनिवारी सायंकाळच्या वेळी धडक कारवाई करीत मोठा शस्त्रसाठा जप्त केला. अब्दुल राजिक अब्दुल खालीक (५५, रा. मोमीनपुरा, दर्यापूर) यासह अन्य दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्यांची कसून चौकशी सुरू आहे.
दर्यापूर येथील बसस्थानकाकडून जुन्या तहसीलकडे जाणाऱ्या रस्त्याच्या बाजूला असलेल्या मोमीनपुरा परिसरातील रहिवासी अब्दुल राजिक याच्या घरात शस्त्रसाठा व शस्त्र बनवण्याचे साहित्य असल्याची गुप्त माहिती दर्यापूर पोलिसांना मिळाली होती. त्याआधारे दर्यापूरचे पोलिस निरीक्षक संतोष ताले यांनी पोलिस बंदोबस्तात संशयितांच्या घरी शनिवारी सायंकाळी ७ वाजताच्या दरम्यान धाड टाकून अब्दुल राजिक याच्या घराची झडती घेतली.
यावेळी ८ तलवारी, भाला, २ फरसे विविध प्रकारचे चाकू, गुप्ती यासह अवजारांना धार लावण्याचे साहित्य आढळून आले. पोलिस कारवाईदरम्यान कुटुंबातील सदस्यांनी आरडाओरड करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी त्याला न जुमानता आक्रमक भूमिका घेत अब्दुल राजिक याच्यासह तिघांना ताब्यात घेत शस्त्रसाठा जप्त केला. दर्यापूर उपविभागीय पोलिस अधिकारी सचिंद्र शिंदे, पोलिस निरीक्षक संतोष ताले, पोलिस उपनिरीक्षक विनायक लंबे, येवदा पोलिस स्टेशनचे ठाणेदार आशिष चेचरे, रहिमापूरचे ठाणेदार नीलेश देशमुख, खल्लारचे ठाणेदार चंद्रकला मेसरे, पीएसआय सिद्धोधन नितनवरे यांच्यासह पोलिस कर्मचाऱ्यांनी या धडक मोहिमेत सहभाग घेतला.