इर्विन चौकात पोलिसांचा चोख बंदोबस्त
By admin | Published: April 12, 2016 12:17 AM2016-04-12T00:17:22+5:302016-04-12T00:17:22+5:30
डॉ. बाबासाहेब आंबडेकर जयंतीनिमीत्त १४ एप्रिल रोजी इर्विन चौकात पोलिसांचा चोख बंदोबस्त लावण्यात येणार आहे.
डॉ. आंबेडकर जयंतीची तयारी : मार्गात बदल, पर्यायी मार्गाची व्यवस्था
अमरावती : डॉ. बाबासाहेब आंबडेकर जयंतीनिमीत्त १४ एप्रिल रोजी इर्विन चौकात पोलिसांचा चोख बंदोबस्त लावण्यात येणार आहे. या ठिकाणी बौध्द बांधव मोठ्या प्रमाणात एकत्रित येत असल्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असते. त्यापार्श्वभूमीवर इर्विन चौकाकडे येणाऱ्या मार्गात बदल करण्यात आले असून पोलिसांनी पर्यायी मार्गाची व्यवस्था केली आहे.
१४ एप्रिल रोजीच्या जयंतीनिमीत्त भाविक सकाळी ६ वाजतापासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे दर्शन घेण्यासाठी येतात. यावेळी इर्विन चौकाला यात्रेचे स्वरुप येते. चौकात विविध साहित्यांचे स्टॉल लावण्यात येत असल्यामुळे भाविक साहित्य खरेदीसाठी गर्दी असते. त्यातच शहरातील विविध भागात मिरवणूका व शोभायात्रेचे आयोजन करण्यात येते. त्यामध्ये मोठ्या संख्येत पुरुष, महिला, लहान मुले व मुली इर्विन चौकात येत असल्यामुळे नागरिकांची एकच गर्दी होते. अशावेळी सामाजीक अशांतता निर्माण होऊन कायद्या व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने इर्विन चौकाकडे येणारी सर्व प्रकारची वाहतूक बंद करण्यात येणार आहे. वाहतुकीत बदल करण्याच्या अधिसूचना पोलिसांनी निर्गमित केली असून या अधिसूचनांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनाचालकांवर मोटार वाहन कायद्यान्वये कारवाई केली जाणार असल्याची माहिती पोलीस उपायुक्त नितीन पवार यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे दिली आहे. कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने कोणत्याही उणिवा राहू नये यासाठी पोलीस प्रशासनाने सूक्ष्म नियोजन केले आहे. महापालिका प्रशासनाची मदत त्याकरिता घेतली आहे. (प्रतिनिधी)