महापालिकेच्या शाळा निरीक्षकाला अटक
By admin | Published: June 28, 2014 11:20 PM2014-06-28T23:20:44+5:302014-06-28T23:20:44+5:30
शहरातील महापालिकेच्या मराठी शाळेतील प्रभारी मुख्याध्यापिकेचे मानसिक व शारीरिक शोषण केल्याच्या आरोपाखाली फ्रेजरपुरा पोलिसांनी महापालिकेच्या शाळा निरीक्षकाला अटक केली.
प्रभारी मुख्याध्यापिकेची तक्रार : लैंगिक शोषणाचा आरोप
अमरावती : शहरातील महापालिकेच्या मराठी शाळेतील प्रभारी मुख्याध्यापिकेचे मानसिक व शारीरिक शोषण केल्याच्या आरोपाखाली फ्रेजरपुरा पोलिसांनी महापालिकेच्या शाळा निरीक्षकाला अटक केली. या घटनेमुळे महापालिका प्रशासनासहित शिक्षण क्षेत्रातही खळबळ उडाली आहे.
अटक करण्यात आलेल्या शाळा निरीक्षकाचे नाव प्रवीण रावसाहेब पाटील (४१, राधानगर, समृध्दी अपार्टमेंट) असे आहे. महापालिकेच्या मराठी शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत व अलीकडेच प्रभारी मुख्याध्यापिका म्हणून कार्यभार सांभाळणाऱ्या शिक्षिकेला गेल्या सहा महिन्यांपासून शाळा निरीक्षक त्रास देत होता. शाळेच्या कामकाजात त्रुटी काढून कारणे दाखवा नोटीशी बजावणे, सतत भ्रमणध्वनीवरून त्रास देणे, शिक्षिकेचा पाठलाग करणे, अश्लील संभाषण करून हैराण करणे आदी प्रकार या शाळा निरीक्षकाद्वारे केले जात होते. सदर शिक्षिका फ्रेजरपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका वस्तीत मुलीसमवेत एकट्याच राहतात. त्यांचे पती पुणे येथे कार्यरत आहेत.
सततच्या त्रासाबद्दल या शिक्षिकेने तिच्या पतीकडे तक्रार केली होती. पतीने शाळा निरीक्षकाला समज दिली होती. परंतु त्यानंतरही शाळा निरीक्षकाचा त्रास सुरूच होता. दोन वेळा दारू पिऊन या निरीक्षकाने शिक्षिकेच्या घरात शिरून धुमाकूळ घातला. शिक्षिकेचे लैंगिक शोषण करण्याचा प्रयत्नदेखील केला. शाळा निरीक्षकाच्या या कृत्याने घाबरलेल्या शिक्षिकेने त्यांच्या पतीला शहरात बोलावून शुक्रवारी पोलीस उपायुक्त सोमनाथ घार्गे यांची भेट घेतली. घार्गे यांनी शिक्षिकेच्या तक्रारीची गांभीर्याने दखल घेऊन तत्काळ फ्रेजरपुरा पोलीस ठाण्याचे ठाणेदार रियाजुद्दीन देशमुख यांना तक्रार नोंदविण्याचे आदेश दिले.
ठाणेदार देशमुुख यांच्या मार्गदर्शनात एसएसआय गजानन कोठेकर, नीलेश वानखडे यांच्या चमूने आरोपी प्रवीण पाटील याला उशिरा रात्री अटक केली. त्याच्याविरूध्द भादंविच्या कलम ३५४, ३५४ (अ), ३५४ (ब), ३५४ (क), ३५४ (ड), ४५२, ५०४, ५०६ अंतर्गत गुन्हा नोंदविला आहे. दरम्यान प्रवीण पाटील याला या प्रकरणी न्यायालयाने जामीन दिला आहे. प्रभारी मुख्याध्यापिकेने केलेल्या आरोपाचे पाटील यांच्या वकिलांनी खंडन केले. (प्रतिनिधी)