कला जगण्याचे बळ देते अन् सौंदर्याची दृष्टीही, डॉ. विजय दर्डा यांचे प्रतिपादन

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2023 12:58 PM2023-06-10T12:58:41+5:302023-06-10T12:59:31+5:30

अंबानगरीत कलादालनाचे थाटात लोकार्पण

Art gives strength to live and vision of beauty - Assertion by Dr. Vijay Darda | कला जगण्याचे बळ देते अन् सौंदर्याची दृष्टीही, डॉ. विजय दर्डा यांचे प्रतिपादन

कला जगण्याचे बळ देते अन् सौंदर्याची दृष्टीही, डॉ. विजय दर्डा यांचे प्रतिपादन

googlenewsNext

अमरावती : कला कोणतीही असो ती माणसाला जगण्याचे बळ देते आणि सौंदर्यांची दृष्टीही. अमरावती शहराच्या वैभवात भर घालत कलावंतांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी कॉलेज ऑफ ॲनिमेशन बायोइंजिनिअरिंग ॲण्ड रिसर्च येथे विजय राऊत कलादालन उभारण्यात आले आहे. अमरावती हे ऐतिहासिक वारसा लाभलेले शहर आहे. या शहराने अनेक कलावंत दिले आहेत. मात्र, त्यांना प्रोत्साहन देणारे कलादालन येथे नव्हते. ती उणीव आता विजय राऊत यांनी भरून काढली आहे, असे प्रतिपादन लोकमत मीडिया समूहाचे चेअरमन माजी खासदार डॉ. विजय दर्डा यांनी केले.

प्रारंभी डॉ. विजय दर्डा यांनी कलादालनाचे अवलोकन करून तेथील प्रत्येक कलाकृतीची सविस्तर माहिती विजय राऊत यांच्याकडून जाणून घेतली. विशेष म्हणजे, त्यातील एक कलाकृती स्वत: विकत घेऊन डॉ. दर्डा यांनी या कलादालनाचे खऱ्या अर्थाने लोकार्पण केले. दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाला सुरुवात झाली. यावेळी विजय राऊत, माजी राज्यमंत्री डॉ. सुनील देशमुख, आध्यात्मिक गुरू तथा सुप्रसिद्ध चित्रकार धनंजय वर्मा, लोकमतचे संचालक( परिचालन) अशोक जैन, लोकमतचे समूह संपादक विजय बाविस्कर, प्रतिदिनचे संपादक नानक आहुजा, हिंदुस्थानचे संपादक विलास मराठे, सेवानिवृत्त उपविभागीय पोलिस अधिकारी पी.टी. पाटील, नितीन मोहोड, ॲड. श्रीकांत खोरगडे, पप्पू पाटील, विजय राऊत यांच्या पत्नी सरोज राऊत, कन्या सृष्टी राऊत, हिमांशू खारकर आदींची उपस्थिती होती.

डॉ. दर्डा यांनी उद्घाटन भाषणात विजय राऊत यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले, सर जे.जे. कॉलेज ऑफ आर्टस् मुंबई येथील विद्यार्थी विजय राऊत यांच्या संकल्पनेतून उभारण्यात आलेल्या या कॉलेजची अशीच यशस्वी वाटचाल होत राहील, याचा मला पूर्ण विश्वास आहे.

या कलादालनामुळे स्थानिक चित्रकार, छायाचित्रकार, तसेच इतर कलाकारांना कलेचे प्रदर्शन घडवून आणण्यासाठी, तसेच कलाप्रेमी व शहराला भेट देणाऱ्यांसाठी एक प्रेक्षणीय स्थळ उपलब्ध झाले आहे. डॉ. विजय दर्डा यांचे नुकतेच ‘रिंगसाइड’ या पुस्तकाचे प्रकाशन झाल्याबद्दल अंबानगरीवासीयांच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला. या सत्काराला उत्तर देताना ते म्हणाले, विजय राऊत यांची ओळख नवीन नसून ती राज ठाकरे यांच्या माध्यमातून झाली.

राज ठाकरे यांच्या घरी लावण्यात आलेल्या एका पेंटिंगकडे मी आकर्षित झालो होतो. त्यावेळी कुतूहलाने या पेंटिंगबद्दल राज ठाकरे यांना विचारणा केली असता, त्यांनी विजय राऊत यांचे नाव सांगितले आणि यातून ही ओळख झाल्याचे ते म्हणाले. याप्रसंगी छायाचित्रकार वैभव दलाल, शिल्पकार शिव प्रजापती, चित्रकार नमिता किरणापुरे, नृत्य कलावंत सायली गणवीर, नाट्य अभिनेता-दिग्दर्शक विशाल तराळ, समाजसेवक प्रदीप बाजड, दिनेश बूब, शिक्षणतज्ज्ञ अतुल गायगोले, ॲनिमेटर हिमांशू रेवस्कर, उद्योजक अमोल डोईफोडे, संगीतकार सचिन गुढे, कलाशिक्षक संजय कुऱ्हे यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिप्रा मानकर यांनी केले.

उडता घोडा शिल्प विमानतळावर लावू : डॉ. सुनील देशमुख

कलावंत विजय राऊत यांनी अतिशय कठीण परिश्रमातून साकारलेला उडता घोडा हे लोखंडी शिल्प येत्या काळात बेलोरा विमानतळाच्या दर्शनी भागात लावू, त्याकरिता राज्य शासनाकडे पाठपुरावा करण्यासाठी मी स्वत: पुढाकार घेईल, अशी ग्वाही माजी राज्यमंत्री डॉ. सुनील देशमुख यांनी दिली.

Web Title: Art gives strength to live and vision of beauty - Assertion by Dr. Vijay Darda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.