परतवाडा शहरात कृत्रिम पाणीटंचाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2021 04:12 AM2021-04-27T04:12:54+5:302021-04-27T04:12:54+5:30
लाखो लिटर पाण्याचा अपव्यय परतवाडा : परतवाडा शहरात पाच दिवसांपासून कृत्रिम पाणीटंचाईमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. शहरांतील काही भागात ...
लाखो लिटर पाण्याचा अपव्यय
परतवाडा : परतवाडा शहरात पाच दिवसांपासून कृत्रिम पाणीटंचाईमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. शहरांतील काही भागात टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. यात काही नागरिकांनी स्वतः पैसे खर्च करून पाण्याचे टँकर आपल्या परिसरात बोलाविले आहेत.
भीषण कृत्रिम पाणीटंचाईला नगरपालिका प्रशासन जबाबदार असून, त्यांच्या दुर्लक्षामुळे नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. लाखो लिटर पाण्याचा अपव्यय यात होत आहे. यात नगरसेवक नगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागातील अभियंत्यांना, तर नागरिक नगरसेवकांना हात जोडत आहेत. पाणीपुरवठा सुरळीत व्हावा, शेवटच्या टोकावरील नागरिकाला पाणी मिळावे, याकरिता नगरसेवकांनी अनेक निवेदने नगरपालिका प्रशासनाकडे दिली आहेत. पण, या निवेदनांची साधी दखलही प्रशासनाने घेतलेली नाही.
परतवाडा शहरातील खापर्डे प्लॉट, ब्राह्मण सभा, घामोडिया प्लॉटसह अनेक भागातील उंचावरील क्षेत्रात या पाणीटंचाईने उग्र रूप धारण केले आहे. यात नळ आल्यानंतरही तासनतास नागरिकांना पाण्याकरिता प्रतीक्षा करावी लागत आहे. शहरात पाईप लाईनमधून येणाऱ्या पाण्याला प्रेशर नाही. नाईलाजाने काही नागरिकांना या पाईप लाईनवर मोटर बसवून पाणी उपसावे लागत आहे.
कोट्यवधींचा खर्च
परतवाडा शहराला पाणी मिळावे, पाणीपुरवठा सुरळीत व्हावा, याकरिता जवळपास ७७ कोटी खर्च करून चंद्रभागा पाणीपुरवठा योजना नगरपालिकेकडून अस्तित्वात आणली गेली. पाणी वितरण व्यवस्था अंतर्गत मजबूत असे पाईपही टाकले गेले. लागलीच पाणीपुरवठ्याच्या अनुषंगाने अचलपूर व परतवाडा या शहरांकरिता परत नव्याने जवळपास ५० कोटीची अमृत पाणीपुरवठा योजना आणली गेली. या अमृत योजनेंतर्गत शहरात नव्याने पाईप टाकले गेले.
पाईपलाईन निकृष्ट?
शहरात रोडच्या एका बाजूने चंद्रभागेची, तर दुसऱ्या बाजूने अमृतची पाईप लाईन फिरविली गेली.
अमृत योजनेंतर्गत शहरात फिरविली गेलेली पाईप लाईन कमजोर असून, जमिनीत आत निर्धारित अंतरावर ती टाकली गेली नाही. अनेक ठिकाणी ही पाईप लाईन जोडली गेली नाही. ज्या ले-आऊटला मान्यता नाही, अशा भागातही ही पाईप लाईन फिरविली गेली. अनेक भागात अमृतची पाईप लाईन अगदी जमिनीवर उथळ बघायला मिळत आहे. त्यामुळे शहरात कृत्रिम पाणीटंचाई निर्माण झाली आहे.