चांदूररेल्वे वनविभागात कृत्रिम पाणवठे
By admin | Published: April 10, 2017 12:23 AM2017-04-10T00:23:50+5:302017-04-10T00:23:50+5:30
चांदूररेल्वे उपविभागीय वनपरिक्षेत्रांत वन्यप्राण्यांसाठी कृत्रिम पाणवठे तयार करण्यात आले आहेत.
उपक्रम : वन्यप्राण्यांच्या शिकारीवर वनविभागाची करडी नजर
चांदूररेल्वे : चांदूररेल्वे उपविभागीय वनपरिक्षेत्रांत वन्यप्राण्यांसाठी कृत्रिम पाणवठे तयार करण्यात आले आहेत. यामुळे जंगल सोडून पाण्यासाठी इतरत्र भटकंती करण्याची वेळ वन्यप्राण्यांवर आली नाही. वन्यप्राण्यांच्या शिकारीवरदेखील वनविभागाची करडी नजर राहणार आहे. या उपक्रमाचा वन्यप्राण्यांना अधिक लाभ होत आहे.
पावसाळ्यात वनविभागातील लहानमोठ्या नाल्यांना भरपूर पाण्याचे स्त्रोत असतात. छोटे बंधारेही बांधण्यात आले. त्यात पाण्याचा साठा उन्हाळा लागण्यापूर्वी शिल्लक होता. परंतु आता उन्हामुळे नैसर्गिक पाणवठे कोरडे झाल्याने वनविभागाचे अधिकाऱ्यांनी कृत्रिम पाणवठे तयार करून मुबलक पाण्याची सोय वन्यप्राण्यांना करून दिली आहे.
कृत्रिम पाणवठ्यासाठी प्रथम जंगलात ५०० मीटर अंतरावर योग्य जागा निवडून त्या ठिकाणी खड्डे तयार करण्यात आले. त्यात खड्ड्यात गवताचे आच्छादन करून त्यावर प्लास्टिकची चादर पसरविण्यात आली. त्यावर दगडावर रेती टाकून कृत्रिम पाणवठे तयार करण्याचा उपक्रम सुरू करण्यात आल्याची माहिती वनपरिक्षेत्राधिकारी अनंत गावंडे यांच्याकडून देण्यात आली. आजपर्यंत १५ पाणवठे पूर्ण झाले असून त्यात मशीनद्वारे मजूर लावून दररोज पूर्ण पाणवठे पाण्याने भरण्याचा उपक्रम सुरू आहे. पाणवठे नसले तर वन्यप्राण्याची पाण्यासाठी भटकंती होऊन अवैध शिकाऱ्यापासून धोका होऊ नये म्हणून पाणवठे करण्याचा उपक्रम वन विभागाकडून राबविण्याचा उपक्रम सुरू असतो. (तालुका प्रतिनिधी)