अरुण साधूंचे होते अमरावतीशी नाते, परतवाड्यात झाला होता जन्म
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2017 06:49 PM2017-09-25T18:49:41+5:302017-09-25T18:52:02+5:30
- नरेंद्र जावरे
अमरावती, दि. २५ - पत्रकारिता आणि साहित्य क्षेत्रात आगळा ठसा उमटवून नुकताच जगाचा निरोप घेणा-या अरूण साधू यांचे जन्मगाव अमरावती जिल्ह्यातील परतवाडा हे आहे. सन १९४१ मध्ये परतवाड्यातील प्रसिद्ध विदर्भ मीलच्या क्वॉर्टरमध्ये त्यांचा जन्म झाला. चवथीपर्यंतचे शिक्षण त्यांनी परतवाडा नगरपालिकेच्या शाळेत पूर्ण केले. उच्च माध्यमिक शिक्षण अमरावतीच्या सायन्सस्कोर हायस्कूल, तर महाविद्यालयीन शिक्षण विदर्भ महाविद्यालयात त्यांनी घेतले.
अरूण साधू यांचे वडील मार्तण्डराव साधू परतवाडा येथील विदर्भ मिलमध्ये ‘पिनिंग मास्तर’ पदावर कार्यरत होते. विदर्भ मील परिसरातील निवासस्थानात त्यांचे वास्तव्य होते. मील बंद पडल्याने शेकडो कामगारांवर बेरोजगारीची कु-हाड कोसळली. त्यानंतर अरूण यांचे वडील मार्तण्डराव हे परतवाडा येथील जयस्तंभ चौकानजीकच्या धर्माधिकारी वाड्यात वास्तव्याला गेले. त्यांचे येथील घर आता नामशेष झाले आहे.
पाचवी ते बारावीपर्यंतच्या शिक्षणासाठी अमरावती येथील सायन्सस्कोर शाळेत अरूण साधूंनी प्रवेश घेतला. विदर्भ महाविद्यालयात ते बी.एस्सी.पर्यंत शिकले. एका विषयात ते अनुत्तीर्ण झाले होते. त्यावर्षी त्यांनी जामठी (माना) येथे एका शाळेत शिक्षकाची नोकरीही केली.
पोहण्यात तरबेज
अरूण साधू आणि श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचे कोषाध्यक्ष सुरेश देशपांडे हे आत्ये-मामेभाऊ. या दोघांची खास मैत्री होती. ते दररोज सायंकाळी पोहण्यासाठी श्री हव्याप्र मंडळात जात असत, अशी आठवण सुरेश देशपांडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितली. अमरावतीतील अशोक गोखले, कर्नल अरूण जोशी यांच्याशीदेखील त्यांची मैत्री होती.
मुगलाईपुऱ्यातील वाचनालयात केले वाचन
परतवाडास्थित मुगलाईपुºयाला लागून असलेल्या सार्वजनिक वाचनालयात अरुण साधू नेहमी जात असत. तेथूनच त्यांना वाचनाचा व्यासंग जडल्याचे ज्येष्ठ वैदर्भीय हास्यकवी राजाभाऊ धर्माधिकारी यांनी सांगितले.
शेवाळकर-साधू कुटुंबाची जवळीक
ज्येष्ठ साहित्यिक राम शेवाळकर अचलपूर येथील रहिवासी असल्याने अरूण साधू यांची त्यांच्या माळवेशपुºयातील घरी सतत ये-जा असायची. दोघांनाही साहित्याची आवड असल्याने साहित्यावर प्रदीर्घ चर्चा रंगत असे. अरूण साधू यांच्या निधनाने मराठी साहित्य आणि पत्रकारितेची मोठी हानी झाली आहे. परंतु त्यांचे कार्य अविस्मरणीय राहणार असल्याचे मत दिवंगत राम शेवाळकर यांच्या पत्नी विजया शेवाळकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.