पोहण्याचा मोह जीवावर बेतला, आर्यनचा धरणात बुडून मृत्यू
By प्रदीप भाकरे | Published: June 23, 2024 02:16 PM2024-06-23T14:16:55+5:302024-06-23T14:17:26+5:30
रविवारी सकाळी त्याचा मृतदेह धरणाबाहेर काढण्यात आला. त्याच्या आकस्मिक मृत्युमुळे विलासनगरात शोककळा पसरली आहे.
अमरावती : पोहण्याचा मोह एका १७ वर्षीय मुलाच्या जीवावर बेतला. धरणाच्या काठावरील पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने त्याचा बुडून मृत्यू झाला. आर्यन धनराज बनसोड (१७, विलास नगर आराम मशीन रोड, अमरावती) असे मृताचे नाव आहे. नांदगाव पेठ लगतच्या वाळकी डॅम येथे शनिवारी सायंकाळी सहाच्या सुमारास ती घटना उघड झाली. रविवारी सकाळी त्याचा मृतदेह धरणाबाहेर काढण्यात आला. त्याच्या आकस्मिक मृत्युमुळे विलासनगरात शोककळा पसरली आहे.
माहितीनुसार, आर्यन हा काही मित्रांसमवेत शनिवारी वाळकी डॅम परिसरात फिरायला गेला होता. काठावरूनच तो पोहण्यासाठी धरणाच्या पाण्यात शिरला. मात्र त्याला पाण्याच्या खोलीचा अंदाज आला नाही. त्यामुळे तो बुडाला. काही प्रत्यक्षदर्शींनी ती माहिती नांदगाव पेठ पोलिसांना दिली. त्यानुसार, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षातील शोध व बचाव पथक शनिवारी सायंकाळी ६.३० च्या सुमारास वाळकी डॅमला पोहोचले.
रेस्क्यू पथकाने घटनास्थळी जाऊन जागेची पाहणी केली. तर, टिममधील गोताखोरांनी गळ व हुकच्या साह्याने शोधकार्याला सुरुवात केली. मात्र, रात्रीच्या अंधारामुळे शोधकार्य थांबविण्यात आले. दरम्यान, २३ जून रोजी सकाळी सातच्या सुमारास परत शोध कार्य सुरू करण्यात केले. अथक प्रयत्नानंतर पथकाने आर्यनचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढून शवविच्छेदनाकरीता पोलिसांच्या हवाली केला. रेस्क्यू टिमचे सागर धरमकर, दिपक पाल, दीपक डोरस, गजानन वाडेकर, विशाल निमकर, दिलीप भिलावेकर, अर्जुन सुंदरडे, गणेश जाधव, प्रियांशू तायवाडे यांचा समावेश आहे.