एक स्थलांतर-वर्षात अमरावती जिल्ह्यात तब्बल सहा पक्ष्यांच्या नव्या नोंदी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2024 09:15 PM2024-06-15T21:15:21+5:302024-06-15T21:15:39+5:30

पक्षी निरीक्षक प्रशांत निकम पाटील, शुभम गिरी, धनंजय भांबुरकर, संकेत राजूरकर, अमेय ठाकरे, सौरभ जवंजाळ, अभिमन्यू आराध्य आणि मनोज बिंड यांनी जिल्ह्यातील विविध जलाशये आणि वन्यप्रदेशात पक्ष्यांच्या नोंदी घेतल्या आहेत.

As many as six new bird records in Amravati district in one migration-year | एक स्थलांतर-वर्षात अमरावती जिल्ह्यात तब्बल सहा पक्ष्यांच्या नव्या नोंदी

एक स्थलांतर-वर्षात अमरावती जिल्ह्यात तब्बल सहा पक्ष्यांच्या नव्या नोंदी

मनीष तसरे

अमरावती : मध्य भारतात सप्टेंबर महिन्यापासून स्थलांतरित झालेले हिवाळी पक्षी मे आणि जून महिन्यात परतीची वाट धरतात. या परतीसोबतच काही पक्ष्यांच्या उन्हाळी स्थलांतराचीही स्थिती तयार होते. या कालावधीला एक स्थलांतर-वर्ष समजण्याचा प्रघात आहे. २०२३-२४ या स्थलांतर वर्षात जिल्ह्यात सहा पक्ष्यांची नोंद झाली आहे.

पक्षी निरीक्षक प्रशांत निकम पाटील, शुभम गिरी, धनंजय भांबुरकर, संकेत राजूरकर, अमेय ठाकरे, सौरभ जवंजाळ, अभिमन्यू आराध्य आणि मनोज बिंड यांनी जिल्ह्यातील विविध जलाशये आणि वन्यप्रदेशात पक्ष्यांच्या नोंदी घेतल्या आहेत. यामध्ये उलटचोच तुतारी (टेरेक सँडपायपर) हा पक्षी उत्तर युरोपातून ऑगस्ट ते ऑक्टोबर महिन्यात भारतात दक्षिणेकडे जाण्यासाठी येतो. त्या दरम्यान त्याचा प्रवास महाराष्ट्रातून होतो. समुद्री बगळा (वेस्टर्न रीफ हेरॉन) हा भारतात समुद्र किनारपट्टीलगत निवासी पक्षी काही प्रमाणात अन्न शोधार्थ स्थलांतर करून येतो. लाल छातीची फटाकडी (रडी ब्रेस्टेड क्रेक) हा उत्तर भारत, नेपाळ आणि दक्षिणपूर्व आशियामध्ये वीण घालणारा कोंबडीसदृश पक्षी हिवाळ्यात भारताच्या दक्षिणेकडे स्थलांतर करतो. काळ्या पंखाचा कोकीळ-खाटीक (ब्लॅक विंग ककूश्राईक) हा छोटा पक्षी हिमालयाच्या पायथ्याशी तसेच भारताच्या उत्तरपूर्व भागात आढळत असून, याचे हिवाळ्यात महाराष्ट्रासह भारताच्या दक्षिण-पूर्व भागात स्थलांतर होते. लहान कोरल (व्हीम्बरेल) हा पक्षी थेट आर्क्टिक खंडातून जुलै ते ऑक्टोबर महिन्यात भारतात येतो. दक्षिणेकडे जाताना त्याला महाराष्ट्रातून जावे लागते. यासोबत २०२२ मध्ये टिपलेली, परंतु यावर्षी ओळख पटलेली गुलाबी तिरचिमणी (रोझी पीपीट) यांचाही समावेश आहे. हा पक्षी हिमालय आणि त्यासारख्या उंच थंड प्रदेशात वीण घालून हिवाळ्यात स्थलांतराकरिता दक्षिणेकडील कमी उंचीच्या प्रदेशाची निवड करतो. यावेळी तो महाराष्ट्रातून पुढे जातो.

जिल्ह्यात समृद्ध निसर्ग संपदा

स्थलांतरादरम्यान विदर्भ प्रदेश आणि अमरावती जिल्हा हे मध्यवर्ती ठिकाण असल्यामुळे या प्रदेशात पक्ष्यांच्या आश्चर्यकारक नोंदीकरिता नेहमीच वाव असतो. मेळघाट आणि पोहरा जंगलासारखी विपुल व समृद्ध निसर्ग संपदा या जिल्ह्याला लाभली आहे. विविध जलाशये आणि ऊर्ध्व वर्धासारखी विस्तीर्ण धरणे यामुळे वन-वृक्ष यामध्ये वाढणाऱ्या पक्ष्यांसोबतच गोड्या पाण्यात भरभराटीस येणाऱ्या वनस्पती, सूक्ष्मजीव ते खेकडे व मासे यासारखी एक संपूर्ण परिसंस्था या स्थलांतरित पक्ष्यांना आकर्षित करीत असते.

पक्षी यादी ४०० वर

हिवाळ्याच्या सुरुवातीस देशाच्या पश्चिम समुद्र किनाऱ्यावरून पूर्व किनाऱ्याकडे आणि उन्हाळ्यात पुन्हा उलट असा लांब पल्ल्याचा प्रवास करणारे समुद्री पक्षीसुद्धा अवचितपणे या प्रदेशाचा तात्पुरता विश्रांती थांबा म्हणून उपयोग करतात. यामुळे इथे वैविध्यपूर्ण पक्षिविश्व आढळून येते. जिल्ह्यातील हौशी पक्षी निरीक्षक मोठ्या जिद्दीने आणि आवड म्हणून संपूर्ण वर्षभर हा प्रदेश पिंजून काढतात. या नव्या नोंदीमुळे जिल्ह्यातील पक्षी यादी ४०० या संख्येच्या जवळ पोहोचली आहे.

Web Title: As many as six new bird records in Amravati district in one migration-year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.