प्रवासी मिळताच शाळकरी मुलींना चक्क एसटीतून खाली उतरविले; गर्ल्स हायस्कूल मुख्याध्यापिकेची तक्रार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2022 12:20 PM2022-09-06T12:20:46+5:302022-09-06T12:21:20+5:30
वाहकाच्या या प्रतापामुळे विद्यार्थींनी प्रचंड चिडल्या आहेत.
अमरावती : नजकीच्या मार्डी, यावली, माऊली, परसोडा तसेच दिवाणखेड आदी गावातून शिक्षणासाठी वि्दयार्थी व विर्द्यर्थीनी अमरावती येथे येतात. मात्र, १ सप्टेंबर रोजी गर्ल्स हायस्कूल चौकातून शाळा सुटल्यानंतर मार्डी मार्गाच्या मार्गावरील मुली बस मध्ये बसल्या. तथापि पुढे बियानी चौकात वाहकांनी त्यांना उतरवून दिले. या दरम्यान एका मुलीच्या पायाला दुखापत सुध्दा झाली. वाहकाच्या या प्रतापामुळे विद्यार्थींनी प्रचंड चिडल्या आहेत.
१ सप्टेंबर रोजी शाळा सुटल्यानंतर एस.टी क्रमांक एम एच ४० वाय ५०१३ या मार्डी मार्गावरील जाणाऱ्या मुली गर्ल्स हायस्कूल चौकातून बसमध्ये बसल्या. मात्र पुढे बियाणी चौकात इतर प्रवासी बसल्याने शाळेच्या मुलींना बसमधून चालक व वाहकांनी उतरवून दिले. अशातच एका मुलीच्या पायाला दूखापत झाली. घडलेली घटना ही अशोभनीय आहे. याबाबत संबधीत चालक व वाहकांची चौकशी करून दोषींवर कार्यवाही करावी, याबाबत जिल्हा परीषद कन्या शाळेच्या मुख्याध्यापिका रेखा राऊत यांनी राज्य महामार्ग परिवहन मंडळाला निवेदन दिले आहे.
दरम्यान, शहरातील कन्या शाळेतील अनेक मुली ह्या बाहेर गावावरून प्रवास करतात. शासनाने शिक्षणाकरीता मुलींना एस.टी. ची मोफत पास दिल्यामुळे त्या एस.टी. बसनेच प्रवास करतात. त्या शिवाय त्यांना पर्याय सुध्दा नसतो. जिल्हा परिषदेच्या कन्या शाळेत जवळपास २५० मुली ह्या बाहेरगावावरून प्रवास करतात. मात्र अनेकदा चालक व वाहक त्यांच्या करीता बस थांबवत नाही. त्यामुळे शाळेत येण्यासाठी व शाळा सुटल्यानंतर घरी जाण्यासाठी वेळ होतो. परीणामी पालक चिंतेत राहतात. अनेकदा बस थांबविण्यासाठी शिक्षकांना सुध्दा बसच्या समोर जावून बस थांबविण्याचा प्रयत्न करावा लागतो, असा आरोप शाळेच्या मुख्याध्यापिका, शिक्षकांनी केला.