हिंग अडीच पटीने महागले; अफगाणिस्तान-तालिबान युद्धाचा परिणाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2022 07:00 AM2022-04-08T07:00:00+5:302022-04-08T07:00:05+5:30
Amravati News तालिबानने पूर्णपणे ताबा मिळविल्याने अफगाणिस्तानमधील मालाची आयात व निर्यात थांबल्यामुळे मध्यंतरी अफगाणिस्तानमधून येणाऱ्या दैनंदिन वस्तूंच्या किमतीमध्ये फार मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.
मनीष तसरे
अमरावती : गेल्या काही दिवसांपासून अफगाणिस्तान आणि तालिबान यांच्यात सुरू असलेल्या युद्धामुळे संपूर्ण जगाचे लक्ष त्यांच्याकडे लागले आहे. या घडामोडीमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेवर मोठा परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. तालिबानने पूर्णपणे ताबा मिळविल्याने अफगाणिस्तानमधील मालाची आयात व निर्यात थांबल्यामुळे मध्यंतरी अफगाणिस्तानमधून येणाऱ्या दैनंदिन वस्तूंच्या किमतीमध्ये फार मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यातीलच दैनंदिन जीवनात वापरण्यात येणारा हिंग हा सुद्धा बाजारपेठेत महाग झाला आहे.
अफगाणिस्तानातील सत्ताबदलाचा परिणाम
१) तालिबानने अफगाणिस्तानवर ताबा मिळविल्याने तेथून वस्तूंची निर्यात व आयात थांबली.
२) रोजच्या आहारात वापरले जाणारे हिंगसुद्धा अफगाणिस्तानमधून येत हाेते.
३) भारतात हिंग तयार करण्यासाठी कच्चा माल हा अफगाणिस्तान, कजागिस्तान, उझबेकिस्तानातून आयात केला जातो.
पोटाच्या विकारांवर गुणकारी
रोजच्या स्वयंपाकाच्या पदार्थांमध्ये चव वाढविण्यासाठी हिंग लागतोच त्यामुळे प्रत्येकाच्या स्वयंपाकघरात हिंगाची पूड ही असतेच. हिंग औषधी म्हणूनसुद्धा तेवढाच गुणकारी आहे. हिंग हा पाचक म्हणून काम करतो. हिंगाचा समावेश असणारे चूर्णाष्टक चूर्ण भूक वाढविण्यास मदत करते. तसेच लहान मुलांना जंत झाल्यास हिंगाचा घरगुती उपाय केला जातो. पोटात खूप दुखत असेल आणि गॅसेसमुळे दुखत असेल तर हिंगाचा गरम लेप पोटावर नाभीभोवती लावल्यास आराम मिळू शकतो.
शहाबंदी, काबुली हिंगाला मागणी
हिंग हा अफगाणिस्तान येथून येत असला तरी आग्रा आणि दिल्ली येथे याचे प्रमुख व्यापारी आहेत. तेथून सगळ्या बाजारपेठेत हिंग पाठविला जातो. बाजारात शहाबंदी, काबुलीला अधिक मागणी असते.
सध्या गेल्या काही महिन्यांपासून हिंगाच्या दरात वाढ झाली आहे. भारतात बनविण्यात येणाऱ्या हिंगाकरिता कच्चा माल हा अफगाणिस्तानवरून येत होता. मात्र, तालिबानने आपले सरकार प्रस्थापित केले. मध्यंतरीच्या काळात आयात व निर्यात बंद असल्याने हिंगाचे दर वाढले होते.
- अनिल खरपे (व्यापारी)