व-हाडवासीयांचे दैवत आशा-मनीषा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2017 07:47 PM2017-09-28T19:47:36+5:302017-09-28T19:47:49+5:30
- सचिन मानकर
दर्यापूर - चंद्रभागेच्या तीरावरील आशा-मनीषा माता मंदिर व-हाडात प्रसिद्ध आहे. या देवीला पूर्वी हन्सापुरी-मन्सापुरी माता नावाने ओळखले जात असे. वयोवृद्ध भक्त आजही या देवीचा उल्लेख उपरोक्त नावानेच करतात. या देवी मूळच्या राजपुतान्यातील असून पेंढारी जमातीच्या एका भक्ताबरोबर त्या दर्यापुरात आल्या. मूर्तिरूपाने चंद्रभागेच्या तिरावर स्थिरावल्याची आख्यायिका आहे. त्या काळातील देवी भक्तांनी या मंदिराची उभारणी केली. सुमारे ३५० वर्षांपूर्वी बांधलेले हे मंदिर अद्यापही सुस्थितीत आहे. मंदिराच्या भोवताली असलेला कोट व बुरूज ढासळेला आहे. व-हाडचा तिसरा स्वतंत्र राजा दर्या इमाद शाह याने १५२९ मध्ये हे शहर वासविल्याचा उल्लेख इतिहासात आढळतो. त्यांच्या नावानेच या शहराचे नामकरण दर्यापूर असे झाले. जुन्या वस्तीतील खोलापुरी वेस, देशमुखांचे जुने वाडे आजही त्याची साक्ष देतात. कै.आबासाहेब देशमुख यांच्या वाड्यातून देवी मंदिरापर्यंत भुयारी मार्ग असल्याची जाणकारांची माहिती आहे.सन १८७० साली तत्कालीन हैद्राबाद संस्थानकडून रामा गुरव यांना देवी मंदिराची पूजाअर्चा करण्याचे इमानपत्र मिळाले होते. ती वंशपरंपरा आजही सुरूच आहे. दस-याला भाविक देवीला सोने वाहतात.