थकीत मानधनासाठी आशा कर्मचारी धडकले जिल्हा परिषदेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2021 04:16 AM2021-08-12T04:16:21+5:302021-08-12T04:16:21+5:30
सीईओंना निवेदन; प्रलंबित प्रश्न सोडविण्याची मागणी अमरावती : सर्व प्रकारचे थकीत मानधन त्वरित मिळावे, या मागणीसाठी आयटकच्या नेतृत्वातील ...
सीईओंना निवेदन; प्रलंबित प्रश्न सोडविण्याची मागणी
अमरावती : सर्व प्रकारचे थकीत मानधन त्वरित मिळावे, या मागणीसाठी आयटकच्या नेतृत्वातील आशा व गटप्रवर्तक संघटनेच्या पदाधिकारी कार्यकर्ते सोमवारी जिल्हा परिषदेत धडकल्या. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा यांना मागणीचे निवेदन दिले.
शासनाने १ जुलै २०२० रोजी आशा गटप्रवर्तकाची मानधन वाढ घोषित केली. एप्रिल २०२१ पासून देय होती. परंतु, अद्यापही वाढीव रक्कम मिळाली नाही. त्यानंतर कोरोनाकाळात २३ जून २०२१ रोजी पुन्हा एक निर्णय घेऊन आशा व गटप्रवर्तक यांना अनुक्रमे १५०० व १७०० रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, ही प्रक्रिया अद्याप सुरू केली नाही. याशिवाय वेळोवेळी पूर्ण केलेल्या विविध कामांचा वाढीव मोबदलाही शासनाने आशा कर्मचाऱ्यांना दिला नाही. या सर्व थकीत रकमा त्वरित देण्यात याव्यात, अशी मागणी आंदोलकांनी केली आहे. यावेळी संघटनेच्या जिल्हाध्यक्ष सविता आकोलकर, जिल्हा सचिव प्रफुल देशमुख, आशा गायगोले, विद्या रामटेके, प्रियंका धसकट, सुषमा रहांगडाले, सुनीता जवंजाळ सुवर्णा यावले, अनिता लव्हाळे, नलिनी इंगळे, प्रीती तायडे आदींनी सहभाग नोंदविला.