जेल भरो आंदोलनातून आशा सेविकांनी केला शासनाचा निषेध

By उज्वल भालेकर | Published: February 5, 2024 08:29 PM2024-02-05T20:29:53+5:302024-02-05T20:30:51+5:30

वाढीव मानधनाच्या शासन निर्णयासाठी २३ दिवसांपासून संप सुरू

asha sevaks protest the government through jail bharo movement | जेल भरो आंदोलनातून आशा सेविकांनी केला शासनाचा निषेध

जेल भरो आंदोलनातून आशा सेविकांनी केला शासनाचा निषेध

उज्वल भालेकर, अमरावती : राज्य शासनाने मान्य केलेल्या मानधन वाढीचा शासन निर्णय काढावा, या मागणीसाठी गत २३ दिवसांपासून आशा व गटप्रवर्तक संघटनेच्या नेतृत्वात संप सुरू आहे. परंतु, शासनाने या संपाची दखल न घेतल्याने सोमवारी आशा व गटप्रवर्तक संघटना आयटकच्या नेतृत्वात शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात जेल भरो आंदोलन करून शासनाचा निषेध नोंदविला. यावेळी शेकडो आशा सेविका या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या.

आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांना दिवाळी भेट म्हणून दिवाळीपूर्वी दोन हजार देण्याचे तसेच आशा सेविकांना सात हजार रुपये, तर गटप्रवर्तकांना दहा हजार रुपयांची वाढ देण्याचे आश्वासनही दिले होते. परंतु, या आश्वासनाची पूर्तता राज्य शासनाने अजूनही पूर्ण न केल्याने आयटक संलग्न आशा व गटप्रवर्तक संघटनेच्या वतीने १२ जानेवारीपासून संप पुकारला असून, जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन सुरू आहे. परंतु, या बेमुदत संपाला २३ दिवस होऊनही सरकारच्या वतीने आंदोलनाची दखल घेतलेली नाही. त्यामुळे शासनाचे मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात आशा सेविकांनी एकत्र येऊन जेल भरो आंदोलन करण्यात आले. यावेळी शेकडो आशा सेविका या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत एकच नारा जीआर काढा, अशा घोषणा देण्यात आल्या.

या आंदोलनात ४४९ महिलांना अटक करून नंतर त्यांची सुटका करण्यात आली. या आंदोलनामध्ये आशा व गटप्रवर्तक संघटनेचे जिल्हा सचिव प्रफुल देशमुख, रेखा मोहोड, संजीवनी पटेल, संध्या जावरकर, संध्या शर्मा, किरण उगले, विद्या उगले, आशा ठाकरे, आशा इंगोले, अंजली तानोड, नम्रता ठवरी, सुजाता गजभिये, वनिता कडू, सुनीता सुखदान, चारू वानखडे, मंगला वानखडे, ललिता सहारे, सत्त्वशिला तायडे, सत्यभामा पिंजरकर, वैशाली पाटील, सुनीता झोड, निशा सुपले, अनिता लव्हाळे, अनिता नांदणे, सुवर्णा यावले, अर्चना राऊत, वैशाली पाटील, ललिता वासनिक, पद्मा माहुलकर, वंदना वाकडे, सिंधू कावलकर, कला सेवलकर, राधा कास्देकर, आशा गायगोले, सीता मरगळे, वंदना तराळ, संध्या खांडेकर, आदी शेकडो आशा सेविका सहभागी झाल्या होत्या.

Web Title: asha sevaks protest the government through jail bharo movement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Strikeसंप