आशा स्वयंसेविका, गटप्रवर्तक महिला संपावर; मोर्चातील घोषणांनी जि.प. परिसर दणाणला
By जितेंद्र दखने | Published: October 18, 2023 06:04 PM2023-10-18T18:04:09+5:302023-10-18T18:07:34+5:30
जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील रस्त्यावर आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक महिलांनी ठिय्या मांडून आंदोलन केले
अमरावती : शासकीय सेवेत सामावून घ्यावे या मागणीसाठी आशा स्वयंसेविका व गतप्रवर्तक महिला कर्मचारी बुधवार १८ पासून राज्यव्यापी बेमुदत संपावर गेल्या आहेत. जिल्ह्यातील आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांचा संघटनेचे जिल्हा सचिव प्रफुल्ल देशमुख यांच्या नेतृत्वाखाली इर्वीन चौक येथून जिल्हा परिषदेवर मोर्चा काढण्यात आला. यावेळी आशा स्वयंसेविका व गतप्रवर्तक महिला कर्मचाऱ्यांच्या घोषणाबाजीने जिल्हा परिषदेचा परिसर दणाणला होता.
आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांच्या प्रमुख मागण्यामध्ये आशा स्वयंमसेविकांना कुठल्याही प्रकारचे ऑनलाईन कामे सांगण्यात येवू नये, आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांना दरवरषी दिवाळीपूर्वी एका महिन्याच्या मोबदल्या एवढा बोनस देण्यात यावा, ऑक्टोंबर २०१८ नंतर केंद्र शासनाने आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांच्या माेबदल्यात वाढ केलेली नाही. केंद्र शासनाकडून मोबदल्यात वाढ देण्यात यावी, आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांना किमान वेतन लागू करावे, अशा विविध मागण्यासाठी आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक संघटनेतर्फे दुपारी १२ वाजता मोर्चाला सुरूवात झाली.
जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील रस्त्यावर आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक महिलांनी ठिय्या मांडून आंदोलन केले. यावेळी शासन व प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. आंदोलनात महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक संघटनेच्या जिल्हाध्यक्ष रेखा मोहोड, सचिव प्रफुल्ल देशमुख, वनिता कडू, ललिता ठाकरे, संगिता भस्मे, उज्वला चौधरी,अंजली तानोड, प्रमिला ठवरे, वैशाली पाटील, निशा सुपले, पदमा माहुलकर, सत्यभामा पिंजरकर, वैशाली हिवराळे, अनिता लव्हाळे, किरण उगले, प्रज्ञा माेहोड, संध्या जावरकर यांच्यासह मोठ्या संस्थेने आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक सहभागी झाल्या होत्या.