सोयाबीन पिकाची उत्पादकता वाढविण्यासाठी पेरणीची अष्टसूत्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 04:12 AM2021-04-24T04:12:33+5:302021-04-24T04:12:33+5:30
सोयाबीन बियाण्याची पेरणी करण्यापूर्वी घरचे बियाणे असो किंवा बाजारातून खरेदी केलेली बियाणे, त्याची उगवण क्षमता तपासूनच पेरणी करावी. सोयाबीन ...
सोयाबीन बियाण्याची पेरणी करण्यापूर्वी घरचे बियाणे असो किंवा बाजारातून खरेदी केलेली बियाणे, त्याची उगवण क्षमता तपासूनच पेरणी करावी. सोयाबीन बियाण्याचे उगवणीचे प्रमाण ७० टक्के असून, त्यापेक्षा कमी टक्के उगवणशक्ती आल्यास त्याच प्रमाणात बियाण्याची मात्रा वाढवावी. अपवादात्मक परिस्थितीत घरगुती बियाणे ६० टक्के उगवणशक्तीपर्यंत बियाणे म्हणून वापर करता येते. त्यापेक्षा कमी उगवणशक्ती आल्यास बियाणे म्हणून वापर करू नये.
उगवणक्षमता तपासणीची पद्धत
ओल्या गोणपाटावर १०० दाणे न निवडता सरसकट बियाणे रुजविण्यास ठेवावे. न्यूजपेपर/टिश्यू पेपरवर १०० दाणे न निवडता सरसकट बीज रुजविण्यास ठेवावे. सावलीखालील मातीत ३ ते ५ से.मी खोलीवर १०० दाणे न निवडता रुजविण्यास ठेवावे.
योग्य पद्धतीने बीजप्रक्रिया करावी
बीजप्रकिया करूनच पेरणी करावी. रासायनिक बीजप्रक्रिया पेरणीपूर्वी दोन महिन्यांअगोदर किंवा एक दिवस पेरणीपूर्वी कार्बोक्झीन ३७.५ टक्के थायरम ३७.५ ग्रॅम/प्रति किलो बियाण्यास लावावे. जैविक बीजप्रक्रिया पेरणीपूर्वी दोन तास अगोदर करून बियाणे सावलीत सुकवून २५ ग्रॅम रायझोबीयम किंवा ६ मिलि पीएसबी व ट्रायकोडर्मा ५ ग्रॅम किंवा ६ मिलि/किलो बियाण्यास लावावे. शक्यतो दहा वर्षांच्या आतील वाणाची निवड करावी. सलग दोन ते तिन दिवसांत ७५ ते १०० मिमी पाऊस अथवा सहा इंच जमीन ओली झाल्यानंतर, वाफसा आल्यानंतरच पेरणी करावी.
बियाण्याची मात्रा प्रमाणात असावी
सर्वसाधारण पेरणी यंत्राचा वापर केल्यास २६ ते ३० किलो/एकर. बीबीएफद्वारे पेरणी केल्यास २२ किलो/एकर. सरी बरंब्यावर टोकण पद्धतीने १४ ते १६ किलो/एकर. आंतरपिकामध्ये सोयाबीन, तूर असल्यास २२ किलो सोयाबीन व २ ते ३ किलो तूर.
पेरणीची खोली
ट्रॅक्टरद्वारे पेरणी करताना रासायनिक खताची नळी फणाच्या खालच्या छिद्रात व बियाण्याची नळी वरच्या छिद्रात लावण्यात आल्याची खात्री करावी. पेरणी करीत असताना बियाणे ३ ते ५ सेंमी खोलीवर पडत असल्याची खात्री करावी. बियाण्याच्या ५ सेंमी खाली खताची पेरणी होत असल्याची खात्री करावी. ट्रॅक्टरद्वारे पेरणी करताना ट्रॅक्टर सेंकड लो गेअरमध्ये १.९६० आर. पी. एम. ठेवून प्रति तास ५० किमी या वेगाने चालविल्यास साधारणत: ४५ ते ५२ मिनिटांत एक एकर पेरणी करावी. रात्रीच्या वेळी पेरणी करू नये. ज्या भागात ७५० मिमीपेक्षा जास्त पाऊस पडतो, अशा ठिकाणी साध्या पेरणी यंत्राने पेरणी करताना प्रत्येक सात तासानंतर ६० से. मी. रुंदीची खोल मृत सरी पाडावी.