‘एटीसी’साठी आश्रमशाळांचे संस्थाचालक सरसावले
By admin | Published: May 3, 2016 12:31 AM2016-05-03T00:31:15+5:302016-05-03T00:31:15+5:30
आदिवासी विकास विभागाच्या अमरावती अपर आयुक्त कार्यालयात गत आठ महिन्यांपासून एटीसी नसल्यामुळे कारभार खोळंबला आहे.
पत्रपरिषद : १६ मे पासून उपोषण
अमरावती : आदिवासी विकास विभागाच्या अमरावती अपर आयुक्त कार्यालयात गत आठ महिन्यांपासून एटीसी नसल्यामुळे कारभार खोळंबला आहे. मात्र आता १४ मेपर्यत एटीसीपदी अधिकारी नियुक्त करण्यात आले नाही तर १६ मेपासून महाराष्ट्र अनुदानित आदिवासी आश्रमशाळा चालक संस्था लाक्षणिक उपोषण करतील, असा इशारा सोमवारी पत्रपरिषदेतून दिला आहे.
आदिवासी आश्रमशाळा चालक संस्थाचे अध्यक्ष अशोक वानखडे यांनी अमरावती एटीसी कार्यायलाचा कारभार सात प्रकल्प कार्यालय तर १३ जिल्ह्यांमध्ये विस्तारलेला आहे. ७०० ते ८०० कोटी रुपयांचे बजेट या कार्यालयाचे असून आठ महिन्यांपासून एटीसी पदाचा कारभार प्रभारी सुरु आहे. अमरावतीच्या फाईल प्रभाररी एटीसी माधवी खोडे यांच्याकडे नागपूरकडे पाठविल्या जातात. अमरावतीत कायमस्वरुपी एटीसी पदी अधिकारी नसल्याने शैक्षणिक, योजना, वसतिगृहे, रोजगार, कुपोषण, विकास कामे खोळंबल्याचा आरोप करण्यात आला. तसेच संगीता शिंदे यांनी आश्रमशाळांमधील शिक्षकांच्या नियुक्त्या, वेतन, पदमान्यता, संच मान्यता, वार्षिक नियोजन रोस्टर, विद्यार्थ्यांचे परिरक्षण वेतन, शिक्षकांच्या प्रलंबित फाईली, वसतिगृहाचे प्रश्न आदींचा बट्ट्याबोळ झाल्याचे सांगितले. आदिवासी समाजासाठी अनेक योजना राबवित असल्याचा गवगवा केला जात असताना प्रमुख अधिकारी नसल्यामुळे योजनांची अंमलबजावणी कशी होणार, हा सवाल शिंदे यांनी उपस्थित केला. एटीसीपदी अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांना देखील यापूर्वी निवेदन देण्यात आले आहे. आता शासनाने एटीसीपदी १४ मेपर्यत अधिकाऱ्यांची नियुक्त करावे अन्यथा १६ मेपासून विभागीय आयुक्त कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण केले जाईल, अशी माहिती देण्यात आली. एटीसीपदी अधिकारी नियुक्त केले जाईल असे वारंवार सांगितले जात असले तरी शासन आदिवासींबाबत गंभीर नाही. पत्रपरिषदेला अशोक वानखडे, संगीता शिंदे, सुरेश रामटेके, प्रवीण पेटकर हे उपस्थित होते. (प्रतिनिधी)