आशिया स्पोर्टस चॅम्पियनशिप; मेळघाटच्या गोकुलची सोनेरी कामगिरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2018 05:18 PM2018-11-27T17:18:30+5:302018-11-27T17:19:56+5:30
दारिद्र्य, कुपोषण आणि मागास भागाचा शिक्का असलेल्या मेळघाटातील आदिवासीबहुल राहू या छोट्याशा गावातील गोकुल राघो येवले या युवकाने आशियाई स्पर्धेत दोन सुवर्णपदकांची कमाई केली. त्याच्या या कामगिरीने सर्वांना अचंबित केले आहे.
मारुती पाटणकर
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : दारिद्र्य, कुपोषण आणि मागास भागाचा शिक्का असलेल्या मेळघाटातील आदिवासीबहुल राहू या छोट्याशा गावातील गोकुल राघो येवले या युवकाने आशियाई स्पर्धेत दोन सुवर्णपदकांची कमाई केली. त्याच्या या कामगिरीने सर्वांना अचंबित केले आहे.
काठमांडू येथे २३ व २४ नोव्हेंबरला आशिया स्पोर्टस चॅम्पियनशिप पार पडली. यामध्ये देशाचे प्रतिनिधित्व करीत गोकुल राघो येवले (२३) याने १०० व २०० मीटर शर्यतीत दोन सुवर्णपदकांची कमाई केली.
राहू येथीलच जि.प. शाळेतील शिक्षक पवन बोके यांनी गोकुलला योग्य मार्गदर्शन करून त्याला विविध स्पर्धांमधे सहभागी होण्यास प्रोत्साहन दिले. खेळासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध नसल्याने त्याने अमरावती येथे राहून सराव केला. मुंबई येथील स्पोर्ट अथॉरिटी आॅफ इंडियाने घेतलेल्या चाचणीत गोकुलने प्रावीण्य प्राप्त केल्यावर त्याची काठमांडू येथे होत असलेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली होती. ही निवड सार्थ ठरवित गोकुलने दोन सुवर्णपदकांची कमाई केली.
शिक्षक ते मेंटॉर
शिक्षक पवन बोके यांची कामगिरीदेखील थक्क करणारी आहे. राहू येथील लोकांची शिक्षणाबद्दल अनास्था दूर करीत त्यांनी दोन वर्षांत गावातील सहा तरुणांना शासकीय नोकरी मिळविण्याचा मार्ग दाखविला. क्रीडाक्षेत्रातही लक्ष घालून गोकुलसारखा खेळाडू घडविला. त्यांची याच वर्षी बदली धामणगाव येथे बदली झाली. तेथूनच ते गोकुलला मार्गदर्शन देत असतात.