लिफ्ट मागणे बेतले जिवावर, जावयाचा मृत्यू; अमरावती जिल्ह्यातील भीषण अपघाताचे वास्तव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2022 10:16 PM2022-01-11T22:16:41+5:302022-01-11T22:20:15+5:30

Amravati News सोमवार दि. १० जानेवारी रोजी रात्री अमरावती जिल्ह्यात झालेल्या भीषण अपघातात चौघांचा जागीच मृत्यू झाला होता. यात एक व्यक्ती आपल्या सासरी आला होता व लिफ्ट मागून गावी जात होता.

Asking for a lift kills son in law; The reality of a terrible accident in Amravati district | लिफ्ट मागणे बेतले जिवावर, जावयाचा मृत्यू; अमरावती जिल्ह्यातील भीषण अपघाताचे वास्तव

लिफ्ट मागणे बेतले जिवावर, जावयाचा मृत्यू; अमरावती जिल्ह्यातील भीषण अपघाताचे वास्तव

Next
ठळक मुद्देअपघातात ठार झालेल्या तिघांवर परतवाड्यात, एकावर जळगावात अंत्यसंस्कार

अमरावती : अकोट-शेगाव मार्गावर दि. १० जानेवारी रोजी रात्री अपघातात मृत्युमुखी पडलेल्या चौघांवर आपापल्या गावी मंगळवारी सायंकाळी ५ च्या सुमारास अंत्यसंस्कार करण्यात आले. तिघांवर परतवाडानजीक एकलासपूर येथे, तर लिफ्ट मागून गावी जाण्यासाठी निघालेल्या तेथील जावयावर जळगाव येथे त्यांच्या गावी अंत्यसंस्कार पार पडले.

चालक अंकुश प्रल्हाद दिवटे (३०, रा. एकलासपूर, ता. अचलपूर), अक्षय ऊर्फ विकी अशोक अवघड (२८, रा. तांबेनगर, परतवाडा) व आकाश अवधूत कुकडे (२९, रा. गुरुकुल कॉलनी, परतवाडा), तर घनश्याम चावरे (रा. जळगाव) अशी मृतांची नावे आहे. तिघे शेगाव येथे जाण्यासाठी सोमवारी सायंकाळी एमएच २७ एआर ९७९६ क्रमांकाच्या चारचाकीने परतवाड्याहून निघाले होते अंकुश दिवटे चालक असून, त्याच्या ताब्यातील चारचाकी ऋषभ जयंत जयसिंगपुरे (रा. चिखलदरा स्टॉप, परतवाडा) यांच्या मालकीची आहे. अपघात एवढा भीषण होता की, घटनास्थळीच चौघांचा मृत्यू झाला. अपघातातील दगावलेले अचलपूर तालुक्यातील तीनही युवक अविवाहित होते.

ओळखीची लिफ्ट जिवावर बेतली

जळगाव येथील घनश्याम चावरे हे परतवाडा येथे सासरी आले होते. सोमवारी सायंकाळी त्यांना परतायचे होते. एसटीचा संप असल्याने त्यांना युवकांसोबत चारचाकीत पाठविण्यात आले. अपघातात त्यांचाही मृत्यू झाला. परतवाडा येथील गोपाल तिवाण (रा. छोटा बाजार परिसर) यांचे ते जावई होते.

तिघांवर अंत्यसंस्कार

खासगी चालक अंकुश दिवटे याच्या पश्चात एक भाऊ, बहीण, वडील आहेत. परतवाडा-चिखलदरा मार्गावरील एकलासपूर येथे सायंकाळी चार वाजता त्याच्यावर अंत्यसंस्कार पार पडले. आकाश कुकडे हा परतवाडा बस स्थानकापुढे पानटपरी चालवित होता. वडील महामंडळात चालक आहेत. मोठा विवाहित भाऊ पुण्याला राहतो. अक्षय ऊर्फ विकी अवघड फोटोग्राफीचा व्यवसाय करीत होता. त्याचे वडील वनविभागातून लॉगिन युनिट येथून चालकपदावरून सेवानिवृत्त झाले. या दोघांवर परतवाड्यात अंत्यसंस्कार झाले.

असा झाला अपघात

परतवाड्याहून शेगावकडे जात असताना देवरीफाटा ते रौंदळा मार्गावरील खड्ड्यांमुळे भरधाव कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार झाडावर आदळली. ही घटना सोमवार दि.१० जानेवारी रोजी रात्रीच्या सुमारास घडली.

 रात्रीच्या सुमारास रौंदळ्या फाट्यानजीक खड्डेमय रस्त्यामुळे कारचालकाचे कारवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे भरधाव कार ही झाडावर आदळली. या अपघातात कारमधील चौघे जण जागीच ठार झाले. अपघात एवढा भीषण होता की, कारचा चुराडा झाला. 

 

 

 

Web Title: Asking for a lift kills son in law; The reality of a terrible accident in Amravati district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात