सत्ताधाऱ्यांवर लगाम लावण्यासाठी  'आसूड'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2018 10:20 PM2018-05-23T22:20:12+5:302018-05-23T22:20:39+5:30

'Asood' | सत्ताधाऱ्यांवर लगाम लावण्यासाठी  'आसूड'

सत्ताधाऱ्यांवर लगाम लावण्यासाठी  'आसूड'

googlenewsNext
ठळक मुद्देबच्चूकडू : तिवस्यात जाहीर सभा, पश्चिम महाराष्ट्रासह अनेक जिल्ह्यांतून

लोकमत न्यूज नेटवर्क
तिवसा : शेतकरी, शेतमजूर, बेरोजगार, दिव्यांग आदींच्या न्याय्य हक्कासाठी व शेतकऱ्यांच्या हिताची लढाई लढण्यासाठी ही 'आसूड' यात्रा आहे. सत्तेवर बसणाऱ्यांवर लगाम लावण्याचे काम आम्ही करीत राहणार, सत्ता हा प्रहार संघटनेचा विषय नाही, असा खणखणीत इशारा आ. बच्चू कडू यांनी तिवसा येथे आसूड यात्रेच्या जाहीर सभेत दिला.
तिवसा येथील नगरपंचायत चौकात आ. बच्चू कडू यांची जाहीर सभा बुधवारी सकाळी पार पडली. जाहीर सभेच्या व्यासपीठावर प्रहार जिल्हाप्रमुख छोटू महाराज वसू, मनोज अंबलकर, गझलकार नितीन देशमुख, प्रमोद कुदळे, अतुल खुपते, गजू कुबडे, प्रवीण हेंडवे, मंगेश देशमुख, बल्लू जवंजाळ, तिवसा तालुकाप्रमुख गजू कडू, संघटक राज माहोरे यांच्यासह अनेक जिल्ह्यांतील प्रमुख उपस्थित होते. आसूड यात्रेला व सभेला विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांतून शेकडो वाहनांतून हजारो कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते.
आसूड सभेची भूमिका मांडताना आ.बच्चू कडू यांनी काँग्रेस व भाजपा सरकारचा खरपूस समाचार घेतला. अलीकडच्या १२ वर्षांपूर्वी राज्यात काँग्रेसची सत्ता होती. त्याच सुमारास २००६ मध्ये स्वामिनाथन आयोग स्थापन झाला. मात्र, अजूनही त्या शिफारशी लागू झालेल्या नाहीत. आता सत्ता नसताना तेच शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी हल्लाबोल करतात. म्हणजेच काँग्रेस असो की भाजपचे सरकार, शेतकऱ्यांचे कुठलेही घेणे-देणे या सत्ताधाऱ्यांना नाही. भाजप सरकारने अपघात विमा व पीकविम्यातून कंपन्यांचे खिसे भरले. सत्तेवर बसणाऱ्यांवर लगाम ठेवण्याचे काम आता 'प्रहार' करणार आहे. शेतकऱ्यांप्रति तळमळ ठेवून या आसूड यात्रेतून शेतकरी, जनतेला न्याय मिळवून देण्याची भूमिका आम्ही पार पाडू, असे आ. बच्चू कडू म्हणाले. शेतकरी व कार्यकर्त्यांच्या भरगच्च उपस्थितीमुळे सभास्थळ खचाखच भरले होते.
चांदूर रेल्वेमार्गे 'आसूड' यात्रा
यवतमाळ जिल्ह्यातील दाभडी येथून आसूड यात्रेचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी मंगळवारी रात्री ११ वाजता चांदूर रेल्वे मार्गाने ही आसूड यात्रा तिवसा तालुक्यात दाखल झाली. कुऱ्हा येथे या यात्रेचे जोरदार स्वागत करण्यात आले, तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या कर्मभूमीत मुक्काम ठोकला. सकाळी आ. बच्चू कडू यांनी महासमाधीचे दर्शन घेतले. ही यात्रा अमरावती-नागपूर महामार्गाने बुधवारी सकाळी ११ वाजता तिवसा नगरपंचायतजवळ पोहोचली. येथे जाहीर सभा घेण्यात आली.
पोटाचा प्रश्न मिटलेला नाही; शौचालयाची सक्ती
शेतकरी आत्महत्या थांबवायच्या असतील, तर शेतमालाला भाव दिला पाहिजे. पण, आज ऊसाचा भाव कमी करून पाकिस्तानातून साखर आयात करण्याचे उफराटे धोरण राबविले जात आहे. लोकांना रोजगार नाही. पोटावर लाथ मारली जात आहे. पोटाचाच प्रश्न मिटलेला नाही अन् दुसरीकडे शौचालय बांधण्यास सांगितले जात असल्याची टीका आ.कडू यांनी केली.

Web Title: 'Asood'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.