‘अॅस्पायर एज्युकेशन फेअर’चा समारोप
By admin | Published: June 20, 2017 12:07 AM2017-06-20T00:07:54+5:302017-06-20T00:07:54+5:30
मागील तीन दिवसांपासून संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनात सुरू असलेल्या ‘लोकमत अॅस्पायर एज्युकेशन फेअर’चा रविवारी थाटात समारोप करण्यात आला.
उत्स्फूर्त प्रतिसाद : शेवटच्या दिवशी स्पर्धा परीक्षेवर मार्गदर्शन
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : मागील तीन दिवसांपासून संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनात सुरू असलेल्या ‘लोकमत अॅस्पायर एज्युकेशन फेअर’चा रविवारी थाटात समारोप करण्यात आला. या शैक्षणिक प्रदर्शनीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. प्रदर्शनीत विद्यार्थ्यांना करिअरच्या नव्या वाटा निवडण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले.
प्रदर्शनीच्या शेवटच्या दिवशी विद्यार्थ्यांना यूपीएससी व एमपीएसी या स्पर्धा परीक्षांबाबत मार्गदर्शन करण्यात आले. नागपूर येथील ‘द युनिक अकादमी’चे बी.बी.गायकवाड यांनी विद्यार्थ्यांना विस्तृत मार्गदर्शन केले. स्पर्धा परीक्षांचा बाऊ न करताना योग्य मार्गदर्शन व सातत्यपूर्ण अभ्यासाच्या बळावर विद्यार्थी ही परीक्षा सहजरीत्या उत्तीर्ण करू शकतात, असे त्यांनी मार्गदर्शनात सांगितले. एमपीएससीमध्ये केवळ वैकल्पिक प्रश्नांवर भर दिला जातो तर यूपीएससीमध्ये वैकल्पिक व प्रात्यक्षिक प्रश्नांचा समावेश असतो, असे ते म्हणाले.
पोदार इंटरनॅशनल स्कूलचे प्राचार्य सुधीर महाजन यांनी विद्यार्थ्यांना संकटांचा सामना करण्याची व चिकाटी टिकवून ठेवण्याबद्दल मार्गदर्शन केले. कार्यक्रमात ‘लोकमत’चे उपमहाव्यवस्थापक सुशांत दांडगे प्रामुख्याने उपस्थित होते. संचालन रवि खांडे यांनी केले.
समारोपादरम्यान शैक्षणिक प्रदर्शनीत सहभागी सर्व शैक्षणिक संस्थांना स्मृतिचिन्ह प्रदान करण्यात आले. तीन दिवसांमध्ये याप्रदर्शनीला अनेक विद्यार्थ्यांनी भेटी दिल्यात व लोकमतच्या या उपक्रमाचे कौतुक केले. करिअरसंबंधी शंकासमाधान करून घेतले. कार्यक्रमाच्या उत्कृष्ट आयोजनाबद्दल पालकांनी व विद्यार्थ्यांनी लोकमतचे कौतुक केले.