अस्मानी, सुल्तानी संकटाचे २८४७ बळी !
By admin | Published: June 19, 2016 12:08 AM2016-06-19T00:08:35+5:302016-06-19T00:08:35+5:30
अस्मानी आणि सुल्तानी संकटाच्या माऱ्याने जिल्ह्यात आतापर्यंत तब्बल २८४७ शेतकऱ्यांचा बळी घेतला आहे. सततची नापिकी, उत्पादन खर्चात झालेली वाढ, ...
१६७२ प्रकरणे अपात्र : ११३७ कुटुंबांना मदतीचा हात
अमरावती : अस्मानी आणि सुल्तानी संकटाच्या माऱ्याने जिल्ह्यात आतापर्यंत तब्बल २८४७ शेतकऱ्यांचा बळी घेतला आहे. सततची नापिकी, उत्पादन खर्चात झालेली वाढ, पावसाची अनियमितता, डोईवर असलेले कर्ज आणि कुटुंबांच्या उदरभरणाच्या प्रश्नांचे हे आत्मघाती बळी आहेत.
सन २००१ पासून सुरू झालेले शेतकरी आत्महत्यांचे भयावह सत्र अरबोंच्या उपाययोजनांशी थांबलेले नाही. विदर्भातील वर्धा आणि अमरावती विभागातील पाच अशा सहा जिल्ह्यांना शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हे म्हणून जगात सर्वदूर अपप्रसिद्धी मिळाली. त्यात यवतमाळ पाठोपाठ सर्वाधिक शेतकरी आत्महत्यांची नोंद ‘अंबानगरी’त झाली. डॉ.पंजाबराव देशमुखांसारख्या ‘कृषी’रत्नांच्या जिल्ह्याच्या कपाळावरील शेतकरी आत्महत्यांचा काळा डाग कायमच्या पुसण्यासाठी उपाययोजनांचा पायंडा घालण्यात आला; तथापि अंमलबजावणीअभावी अरबो-खबरो रुपयांच्या योजना प्रत्यक्ष लाभार्थ्यांपर्यंत न पोहोचल्याने शेतकरी आत्महत्यांचे सत्र अव्याहतपणे सुरू राहिले. निसर्गाचा बिघडलेला समतोल आणि अपुऱ्या, अवेळी येणाऱ्या पावसाने त्यात भर घातली. पाणी टंचाई व त्यामागोमाग येणाऱ्या भयाण दुष्काळानेही शेतकरी आत्महत्येसारखे आत्मघातकी पावलाकडे वळला. कर्ज वाटप असो की, कर्जाचे पुनर्गठन, सावकारी कर्ज असो की, खासगी सहकारी बॅँकांचे प्रत्येक बाबतीत शेतकरी नावडले जात आहे. त्याचाच दृश्य परिपाक शेतकरी आत्महत्यांचा वाढत्या घटनांमधून उघड होत आहे. लाखो रुपये उत्पादन खर्च लावून कापूस, सोयाबीनसारखी नगदी पिके हातची गेल्याने आणि तद्नंतर मुला-मुलींचे शिक्षण आणि त्यांचे लग्न कसे करायचे? या विवंचनेत शेतकरी परिस्थितीसमोर नतमस्तक होतो आहे. सन २००१ ते जून २०१६ या साढे पंधरा वर्षांत अमरावती जिल्ह्यात २,८४७ शेतकरी आत्महत्यांची नोंद शासन दरबारी आहे. त्यातील १,१३७ शेतकरी आत्महत्यांची प्रकरणे पत्र गनण्यात आली तर तब्बल १६७२ शेतकरी आत्महत्या मदतीच्या निकषासाठी अपात्र ठरविण्यात आल्या. ३८ प्रकरणे अद्यापही चौकशीसाठी प्रलंबित आहेत. ११३७ शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांनी तुटपुंजी आर्थिक मदत देण्यात आली. मान्सून जोरदार बरसावा या चिंबवर्षावात शेतकरी आत्महत्यांचा डाग पुसून निघावा अशी तमाम शेतकरी कष्टकऱ्यांची आस आहे.