रेल्वे पोलिसावर प्राणघातक हल्ला
By Admin | Published: April 6, 2017 12:12 AM2017-04-06T00:12:41+5:302017-04-06T00:12:41+5:30
मटन खरेदी करताना उद्भवलेल्या वादातून एका रेल्वे पोलीस शिपायावर सत्तुरने प्राणघातक हल्ला करण्यात आला.
कठोरा नाक्यावरील घटना : मटन खरेदी करताना वाद
अमरावती : मटन खरेदी करताना उद्भवलेल्या वादातून एका रेल्वे पोलीस शिपायावर सत्तुरने प्राणघातक हल्ला करण्यात आला. ही घटना बुधवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास कठोरा नाक्यावर घडली. नीलेश सुधाकर कराळे (२१,रा.पवननगर, बडनेरा) असे जखमीचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी संजय दशरथ मदनेकर (४०,रा.प्रवीणनगर) याला ताब्यात घेतले असून यातील मुख्य आरोपी हरिश अशोक लोणारे (२७,रा. बेलपुरा) याचा शोध पोलीस घेत आहेत.
बडनेरा जीआरपीमध्ये कार्यरत नीलेश कराळे (ब.नं.१०६३) हे बुधवारी त्यांचे महेंद्र कॉलनी येथील जावई पांडुरंग नांदुरकर यांच्याकडे गेले होते. नीलेश व पांडुरंग कठोरा नाक्यावर मटन खरेदीकरिता मदनेकर यांच्या मटनविक्री दुकानावर गेले. नीलेश यांना मटन पसंत आले नाही. त्यामुळे ते खरेदी न करता तेथून दुसऱ्या दुकानाकडे निघाले. मात्र, दरम्यान आरोपींनी मटन खरेदी न केल्याच्या कारणांवरून नीलेश यांच्याशी वाद केला. त्यानंतर आरोपी हरिश लोणारे याने नीलेशवर सत्तुरने प्राणघातक हल्ला केला. नीलेश यांच्या पायावर चाकुचे वार झाल्याने ते गंभीर जखमी झाले. त्यांनी तत्काळ गाडगेनगर पोलीस ठाण्यात धाव घेऊन आरोपींविरूद्ध तक्रार नोंदविली. पोलिसांनी नीलेश यांना इर्विन रूग्णालयात नेऊन उपचार केले. तत्पूर्वी पोलिसांनी संजय मदनेकर यांना ताब्यात घेतले होते. गुन्हा दाखल करण्याची पुढील प्रक्रिया सुरु होती.