बारावीचे मूल्यांकन आटोपले, राज्य मंडळाकडे आज गुण पाठविणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2021 04:13 AM2021-07-30T04:13:47+5:302021-07-30T04:13:47+5:30
अमरावती : राज्य शासनाने कोराेना संसर्गामुळे उन्हाळी- २०२१ बारावीच्या परीक्षा रद्द केल्या आहेत. आता परीक्षांविना निकाल जाहीर करण्याची लगबग ...
अमरावती : राज्य शासनाने कोराेना संसर्गामुळे उन्हाळी- २०२१ बारावीच्या परीक्षा रद्द केल्या आहेत. आता परीक्षांविना निकाल जाहीर करण्याची लगबग सुरू झाली आहे. गुरुवारी मू्ल्यांकनाचे कार्य आटोपले असून, कनिष्ठ विद्यालयांनी विद्यार्थ्यांचे पाठविलेले गुण हे राज्य मंडळाकडे शुक्रवारी संकेतस्थळावर ऑनलाईन पाठविले जाणार आहे.
ना शाळा, ना परीक्षा थेट निकाल, अशी आता दहावीनंतर बारावीच्या विद्यार्थ्यांना संधी मिळणार आहे. अमरावती विभागीय शिक्षण मंडळाने कोरोना काळातही कनिष्ठ विद्यालयातून बारावीच्या विद्यार्थ्यांचे मूल्यांकन करून ऑनलाईन गुणदान मागविले आहे. कनिष्ठ विद्यालयांना बारावीच्या विद्यार्थ्यांचे मूल्यांकन करताना दहावीचे ३० टक्टे, अकरावीचे ३० टक्के तर बारावीचे ४० टक्के गुण अंतर्गत मूल्यमापनानुसार द्यावे लागले. त्यानुसार प्रत्येक कनिष्ठ विद्यालयाने विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करून गुणदान केले आहे. अमरावती विभागात बारावीचे एकूण १ लाख ३८ हजार ३७० विद्यार्थी संख्या आहे.
------------------
असे आहे विभागात बारावीचे विद्यार्थी
अकोला :२४८१६
अमरावती : ३५१४६
बुलडाणा : ३१०४२
यवतमाळ : २९१८४
वाशिम :१८१८२
-----------------
कोट
बारावीच्या विद्यार्थ्यांचे मूल्यांकनाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. पूर, पावसामुळे थोडा विलंब झाला. मात्र, शुक्रवारी कनिष्ठ विद्यालयांकडून मिळालेले गुण राज्य मंडळाकडे ऑनलाईन पाठविले जातील. साधारणत: ५ ऑगस्टपर्यंत निकाल जाहीर होतील, अशी अपेक्षा आहे.
- जयश्री राऊत, सहसचिव, विभागीय शिक्षण मंडळ, अमरावती.