फिनले मिलच्या सहायक व्यवस्थापकाला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 04:16 AM2021-04-30T04:16:27+5:302021-04-30T04:16:27+5:30
परतवाडा : येथील फिनले मिलमध्ये कार्यरत महिलेसोबत पाच वर्षांपासून असभ्य वर्तन करण्याच्या आरोपात अचलपूर पोलिसांनी तेथील सहायक ...
परतवाडा : येथील फिनले मिलमध्ये कार्यरत महिलेसोबत पाच वर्षांपासून असभ्य वर्तन करण्याच्या आरोपात अचलपूर पोलिसांनी तेथील सहायक व्यवस्थापकाविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करून बुधवारी मध्यरात्री अटक करण्यात आली.
नरेंद्र कुमार संतराज शर्मा (३७, रा. गंगसरी, रायबरेली, उत्तर प्रदेश, ह.मु. देवमाळी, परतवाडा) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तो फिनले मिलमध्ये सहायक व्यवस्थापक (स्पिनिंग विभाग) या पदावर कार्यरत आहे. संबंधित महिलेच्या फिर्यादीवरून आरोपीविरुद्ध भादंविच्या ३५४ अ, ३५४ डी अन्वये अचलपूर पोलिसांनी गुन्हा दाखल करून बुधवारी मध्यरात्री अटक केली आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून दखल नाही
संबंधित आरोपीकडून होणाऱ्या असभ्य व अश्लील हावभावासंदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांना आपण सांगितले. मात्र, त्यांनी कुठलीही दखल घेतली नसल्याचे फिर्यादी महिलेने तक्रारीत म्हटले आहे. त्यामुळे घटनेचे गांभीर्य पाहता, फिनले मिलच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची चौकशी होणे गरजेचे ठरत आहे. सदर घटनेचा तपास ठाणेदार सेवानंद वानखडे यांच्या मार्गदर्शनात महिला सहायक पोलीस निरीक्षक स्नेहल आढे व कर्मचारी करीत आहेत.
बॉक्स
पूर्वी वादग्रस्त ठरली होती मिल
फिनले मिलमध्ये कार्यरत महिला कर्मचाऱ्यांसोबत अश्लील व असभ्य वर्तन होत असल्याच्या तक्रारी दहा वर्षांपूर्वी झाल्या होत्या. त्यानंतर महिला सदस्यांकडून चौकशीअंती दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले होते. त्यानंतर पुन्हा हे प्रकरण उघडकीस आल्याने मिल वादग्रस्त ठरली आहे.
दीपाली चव्हाण प्रकरणानंतर अलर्ट
हरिसाल येथील वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या मानसिक त्रासामुळे त्यांनी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली होती. त्यानंतर महाराष्ट्रभर याचे पडसाद उमटले. त्या अनुषंगाने अचलपूरच्या या घटनेला अधिक महत्त्व आले आहे.