धारणीचे सहायक पोलीस निरीक्षक निलंबित
By admin | Published: June 13, 2017 12:11 AM2017-06-13T00:11:17+5:302017-06-13T00:11:17+5:30
२१ मे च्या मध्यरात्री दारू पिऊन भाजी बनविण्याचे आदेश दिल्यावर याचे पालन न केल्याने हॉटेलचालकास मारहाण ...
नायब कॉन्स्टेबलवरही कारवाई : पोलीस अधीक्षकांचे आदेश
लोकमत न्यूज नेटवर्क
धारणी : २१ मे च्या मध्यरात्री दारू पिऊन भाजी बनविण्याचे आदेश दिल्यावर याचे पालन न केल्याने हॉटेलचालकास मारहाण करणाऱ्या सहायक पोलीस निरीक्षकासह त्याच्या लेखणीकाला निलंबित करण्यात आले. या प्रकरणात पोलीस अधीक्षक अभिनाश कुमार यांच्याकडे तक्रार केल्यानंतर ओरोपी पोलीस कर्मचाऱ्यावर अॅट्रॉसिटी अॅक्टअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
रविवारी सायंकाळी एपीआय महादेव भारसाकळे व नायब पोलीस कॉन्स्टेबल मनोज देशमुख यांच्या निलंबनाचे आदेश पोहोचले होते. या निलंबन कारवाईमुळे पोलीस वर्तुळात खळबळ उडाली आहे.
धारणी- सावलीखेडा मार्गावरील नारवाटी येथील हॉटेलचालक गोविंदा सुखदेवे यांच्या तक्रारीवरून पोलीस अधीक्षक अभिनाश कुमार यांच्या आदेशाने गुन्हे नोंदविण्यात आले. याप्रकरणी उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल नेहू यांच्याकडे तपास असून तपासाअंती त्यांना अटकेची शक्यता वर्तविण्यात येत होती. या प्रकरणात फिर्यादी गोविंदा सुखदेवे यांच्यावर मारहाण करणाऱ्यांनी अवैधरीत्या दारूविक्री केल्याची तक्रार दिली असल्याने या प्रकरणी पोलिसांपुढे तपास करण्याचे कठोर आवाहन उभे ठाकले आहे. याप्रकरणी पोलिसांनी महादेव भारसाकळे व मनोज देशमुख यांच्याविरुद्ध १५४ (३), भादंवि ३२३, ४२७, ५०४, ५०६ याअन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संपूर्ण चौकशीअंती दोघावर कारवाई करण्यात येणार आहे.
निलबंनाचे आदेश आल्यावर दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांना अमरावती येथील पोलीस अधीक्षक कार्यालयात बोलावून घेण्यात आले आहे.