धूलिकणांनी बळावलाय अस्थमा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2017 11:19 PM2017-10-25T23:19:57+5:302017-10-25T23:20:07+5:30
शहरात हवेतील धूलिकणांचे प्रमाण वाढले असून अमरावतीकरांना शुध्द हवा मिळत नसल्याचा अहवाल प्रदूषण नियंत्रण मंडळाने महापालिकेला दिला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : शहरात हवेतील धूलिकणांचे प्रमाण वाढले असून अमरावतीकरांना शुध्द हवा मिळत नसल्याचा अहवाल प्रदूषण नियंत्रण मंडळाने महापालिकेला दिला आहे. त्याअनुषंगाने या धूलिकणांनी अस्थमा अर्थात दमा या आजाराचा धोका बळावल्याचे निरीक्षण वैद्यकीय तज्ज्ञांनी नोंदविले आहे.
धूलिकणांनी केवळ फुफ्फुसच नव्हे, तर नाक, कान आणि घशासह त्वचा प्रभावित होऊन अस्थमा, त्वचेवर पूरळ उठणे, नाकात अंगुराप्रमाणे गाठी येणे, असे नानाविध विकार बळावले आहेत. श्वसनरोगाने ग्रस्त असलेले रुग्ण वारंवार डॉक्टरांकडे उपचारास जात असल्याचे वास्तव यानिमित्ताने पुढे आले आहे. राजापेठसह शहरातील अन्य भागांतील वाढत्या धूलिकणांनी होणाºया आजारांना जबाबदार कोण आणि नागरिकांना शुद्ध हवा देण्याची जबाबदारी महापालिका की प्रदूषण नियंत्रण मंडळाची हा प्रश्नही आता अगत्याचा ठरला आहे. अस्थमा (दमा) वर कायमस्वरुपी उपचार नसल्याने हयातभर औषधोपचाराचा खर्च उचलण्याशिवाय बाधित अमरावतीकरांना पर्याय उरलेला नाही.
अस्थमामुळे फुफ्फुस आकुंचित
ंअमरावती : प्रदूषण नियंत्रित करणे हाच अस्थमादी श्वसनाच्या आजारांवर एकमेव रामबाण उपाय असल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले आहे. आवाज आणि धुराच्या प्रदूषणाबरोबरच शहरात काही विशिष्ट ठिकाणी हवेतील धूलिकणांनी मर्यादा ओलांडली असल्याची माहिती यानिमित्ताने समोर आली आहे.
राजापेठ भागातील उड्डाणपुलाचे बांधकाम, यामुळे होत असलेली वाहतूककोंडी आणि पोचमार्गावर पडलेल्या खड्ड्यांमुळे धूलिकणातून होणाºया प्रदूषणाचा व त्यातून उद्भवणाºया आजारांचा प्रश्न चव्हाट्यावर आला आहे. शहरातील वाढत्या धूलिकणांच्या दुष्परिणामाबाबत कान-नाक-घसा तज्ज्ञ एम.एम. पाटील यांच्याशी ‘लोकमत’ने संवाद साधला असता, त्यांनी वाढत्या प्रदूषणावर कमालीची चिंता व्यक्त करत ‘प्रिकॉशन इज बेटर दॅन क्युअर’ असा सल्ला दिला. अनेकांना धूलिकणांची एलर्जी असते. त्यामुळे वारंवाार शिंका येणे नाकातून पाणी वाहणे असे विकार उद्भतात. त्यातून अस्थमाचा जन्म होतो. सर्वसाधारणपणे ‘दम’ लागणे या विकाराला अस्थमा संबोधले जाते. अस्थमामुळे फुफ्फुसाचा आतील भाग आकुंचण पावतो. त्यामुळे दम लागत असल्याचे पाटील यांनी सांगितले. अस्थमावर शस्त्रक्रिया नसल्याने रुग्णांना हयातभर केवळ औषधोपचार घ्यावा लागत असल्याचे निरीक्षण त्यांनी नोंदविले.धूळीनेच नव्हे तर वायूप्रदुषणात वाढ झाल्याने श्वसनविकारात प्रचंड वाढ झाल्याची माहिती त्यांनी दिली.
...म्हणून वाढतात धूलिकण
शहरात इमारतींचे बांधकाम, जुन्या इमारती पाडणे, रस्ता डांबरीकरण आणि अनेकविध रस्त्यांचे काम सुरू असते. अशा वेळी हवेतील धूलिकणांचे प्रमाण वाढते. वाहनांमधील इंधनाच्या ज्वलनामुळे हवेत दूषित वायू सोडले जातात. वाहनांच्या वर्दळीमुळे हवेतील धूलिकणांचे प्रमाण वाढत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. रस्त्यांवरील खड्ड्यांमधून वाहने जात असल्याने धूलिकणांचे प्रमाण वाढते.
बचावासाठी उपाययोजना
रस्त्याच्या दुतर्फा झाडे लावावीत. शहरात ग्रीन झोनचे प्रमाण वाढवावे. ग्रीन झोन विकसित करावेत. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करावी. रस्ते खड्डेमुक्त आणि त्यावर कमीत कमी धूळ असावी. डिझेलच्या वाहनांची तपासणी करावी. नागरिकांनी मास्कचा वापर करावा. धूळ निर्माण होणाºया ठिकाणी प्रतिबंधात्मक उपाय योजावेत.
धूलिकणांचा दुष्परिणाम
हवेतील आॅक्साइडचे प्रमाण वाढल्यास माणसाला श्वसनाचा त्रास, तीव्र डोकेदुखी, उलटी, कान दुखणे या विकारांबरोबरच डोळे चुरचुरणे, अस्वस्थपणा, घसा खराब होणे यासारखे त्रास उद्भवतात. हवेतील धूलिकण वाढल्याने श्वसनांचे विकार, दमा, काम करण्याची शक्ती कमी होणे यांसारखे दृश्य परिणाम संभवतात.