खगोलीय घटना : ‘शनि’चे वलय काही काळ होणार अदृष्य
By गजानन उत्तमराव मोहोड | Updated: September 22, 2024 18:34 IST2024-09-22T18:34:31+5:302024-09-22T18:34:45+5:30
यापूर्वी सन २००९ मध्ये घडली होती घटना

खगोलीय घटना : ‘शनि’चे वलय काही काळ होणार अदृष्य
अमरावती: सूर्यमालेतील सर्वांत विलोभनीय कडी असणारा ग्रह म्हणजे शनि. यामुळे शनिचे वेगळेपण दिसून येते, परंतु शनिची ही कडा मार्च २०२५ पासून पृथ्वीवरून काही काळ दिसणार नाही. काही काळानंतर पुन्हा शनिची ही रूबाबदार रिंग पृथ्वीवरून पाहता येईल. यापूर्वी सन २००९ मध्ये अशी घटना घडली होती.
शनि व पृथ्वी यांच्या सापेक्ष स्थितीवर कड्यांचे दृश्य अवलंबून असते. ज्यावेळी पृथ्वी शनिच्या विषववृत्त पातळीत येते. त्यावेळी पृथ्वीवरून शनिची कडी दिसत नाही. अशावेळी शनिला एक अंधूक रेषा छेदत आहे. असा आपल्याला भास होतो. शनिची सुप्रसिद्ध रिंग पाहण्याची संधी केवळ यावर्षापुरतीच आहे.
पुढील वर्षी रिंग हरवून बसलेला शनि कसा दिसेल याची कल्पनाच करवत नाही. सध्या शनि पृथ्वीच्या जवळ आहे. सूर्य मावळल्यानंतर रात्री ८ चे दरम्यान पूर्व क्षितिजावर दिसत आहे. हा ग्रह सध्या रात्रभर दिसत आहे. शनिची रिंग साध्या डोळ्यांनी दिसू शकत नाही. याकरिता मोठ्या टेलिस्कोपची आवश्यकता आहे. जिज्ञासूंनी व खगोलप्रेमिंनी दुर्बिनीतून शनिची रिंग पाहण्याची संधी सोडू नये, असे आवाहन मराठी विज्ञान परिषदेच्या अमरावती विभागाचे अध्यक्ष प्रवीण गुल्हाने व हौशी खगोल अभ्यासक विजय गिरुळकर यांनी केले आहे.
म्हणून शनिची कडी होणार गायब
खगोल अभ्यासकाच्या माहितीनुसार शनि २.५ अंशातून तर पृथ्वीचा अक्ष २३.५ अंशातून कलतो, अशावेळी कड्यांचे सुंदर दर्शन घडते. सध्या शनिची कडी पृथ्वीच्या प्रतलात येऊ लागली आहे. शनिची कडी पुढील वर्षी पृथ्वीच्या पूर्णपणे प्रतलात येईल. त्यामुळे काही काळ शनिची सुप्रसिद्ध रिंग पृथ्वीवरून दिसणार नाही.